इंदापूर तालुक्यात पावसामुळे फळबागांना फटका
अवसरी, ता. १६ : इंदापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे फळबागांमध्ये पाणी साठले आहे. यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. डाळिंब व पेरू बागेत पाणी साठल्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
अवसरी येथील शेतकरी सोमनाथ जाधव म्हणाले की, डाळिंब, पेरू बागेत सतत पाणी साठून राहिल्यास झाडाच्या मुळ्या कुजून झाडांना मर रोग लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे बागांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करणे महत्त्वाचे आहे.
तसेच, इंदापूर महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी या परिस्थितीवर बोलताना सांगितले की, हवामान अंदाजानुसार आपल्या भागामध्ये परतीचा मान्सून आणखी बरसणार आहे. द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी बागायतदारांनी फळबागांची लागवड गादी वाफ्यावर केली असल्यामुळे मुळ्यांना अपाय होण्याची शक्यता फारच कमी आहे. जास्तीचे पाणी बागेतून काढून दिल्यास मुळांभोवती वाफसा राहून हवा खेळती राहील. सध्याच्या उष्ण, दमट व पावसाळी हवामानामध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, ऊस, कडवळ इत्यादी पिकांवर हरितद्रव्य खाणाऱ्या एंथ्रकनोज (Anthracnose) किंवा करपा या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. डाळिंबामध्ये या बुरशीजन्य रोगाला डांबऱ्या असे म्हणतात. रोग व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी मॅन्कोझेब, कॉपर ऑक्सी क्लोराईड झायरम, कार्बेन्डाझिम यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी आलटून पालटून करावी.