फळपिकांच्या लागवडीने इंदापूर तालुक्याला ‘बागायती’ अशी नवी ओळख
वडापुरी (ता. इंदापूर) ः सततची पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि पारंपरिक पिकांना मिळणारा कमी भाव, यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी आता फळबाग शेतीकडे वळाल्याचे दिसते. केळी, डाळिंब, पेरू, सीताफळ, द्राक्ष आणि आंबा यांसारख्या फळपिकांची लागवड तालुक्यात वाढू लागली आहे.
फळबाग शेतीत ठिबक सिंचनाचा वापर होत असल्याने कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळत आहे. तसेच, बाजारपेठेत फळांना चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर होत असल्याचे चित्र आहे. यातच कृषी विभागाकडून मिळणारे मार्गदर्शन, अनुदान योजना आणि प्रशिक्षण यांमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
या भागातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून फळबागा विकसित केल्या असून, इतर शेतकरी त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेत आहेत. यामुळे तालुक्यात शेतीचे स्वरूप हळूहळू बदलत असून, शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे वाटचाल सुरू आहे. आज पाण्याची उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे तालुक्याने शेती क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीही प्रगती होताना दिसत आहे.
पाण्याची मुबलकता ठरतेय मदतगार
इंदापूर तालुक्यात यापूर्वी पाण्याअभावी बरेच क्षेत्र जिरायती होते. त्यामुळे तालुक्याची ओळख जिरायती तालुका अशीच होती. नंतरच्या काळात तालुक्यात पाण्याचे विविध स्रोत निर्माण केले गेले. तसेच, उजनी धरण, तरंगवाडी तलाव, शेटफळ-हवेली तलाव, वडापुरी तलाव व भाटनिमगाव बंधाऱ्यातील पाण्यामुळे जिरायती भाग आज बागायती बनला आहे. पाण्याअभावी एकेकाळी ज्वारी, बाजरी, तूर, हुलगा, मटकी व इतर धान्य पिकवणारा तालुका आता फळबागांमुळे बागायती तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. फळ उत्पादनांमध्ये राज्यात अव्वल म्हणून तालुका गणला जाऊ लागला आहे.
सहकारी कारखाने अन् दूध संस्थांमुळे विकास
छत्रपती सहकारी साखर कारखाना (भवानीनगर), कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, नीरा-भीमा या साखर कारखान्यांसह सोनाई, दूधगंगा, नेचर डिलाईट इत्यादी दूध संस्था, लोणी देवकर येथील एमआयडीसी यांमुळे तालुक्यातील तरुणांना रोजगार तर मिळतोच, त्याचबरोबर शेतीचादेखील विकास झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

