वेल्हे येथे लवकरच सुरू होणार ग्रामन्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेल्हे येथे लवकरच सुरू होणार ग्रामन्यायालय
वेल्हे येथे लवकरच सुरू होणार ग्रामन्यायालय

वेल्हे येथे लवकरच सुरू होणार ग्रामन्यायालय

sakal_logo
By

वेल्हे, ता.२५ : वेल्हे तालुक्यात अनेक वर्षांपासून ग्रामन्यायालयाची मागणी केली जात होती. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे प्रत्यक्षात न्यायालय सुरू झाले नाही. नुकतीच विधी व न्याय विभागाने ग्रामन्यायालयाच्या स्थापना व पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्रामन्यायालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उच्च न्यायालयाने मंजुरी देऊनही ग्रामन्यायालय प्रतीक्षेत होते. याकडे स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शासनाचे याकडे लक्ष वेधले. तसेच आ.थोपटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शंकरराव भुरुक म्हणाले, ‘‘ग्रामन्यायालयासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून ह्या ग्रामन्यायालययाचा प्रश्न सुटला आहे.’’
वेल्हे तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विजय झांजे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊनही छत्रपती शिवरायांच्या राजगड, तोरणागडाच्या वेल्ह्यात ग्रामन्यायालय सुरू झाले नाही. त्यामुळे राजगड, तोरण्याच्या परिसरातील नागरिकांना पुण्यात हेलपाटे मारावे लागत होते. रहिवाशांचे आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे. तालुक्यात ग्रामन्यायालयास सुरू होणार असल्याने शेतकरी कष्टकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.’’
वेल्हे तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील जागडे म्हणाले, ‘‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रलंबित ग्रामन्यायालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लक्ष घातले होते. अखेर शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. ग्राम न्यायालय सुरू करण्यासाठी सर्व पक्षिय कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. न्यायालयामुळे गोरगरीब शेतकऱ्यांसह सर्वांची गैरसोय दूर होणार आहे. परंतु राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून ग्रामन्यायालयाच्या जागेचा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर निकाली निघावा,अशी सामान्य जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.’’