वेल्ह्यातील राष्ट्रवादीचा पाय आणखी खोलात

वेल्ह्यातील राष्ट्रवादीचा पाय आणखी खोलात

Published on

मनोज कुंभार : सकाळ वृत्तसेवा
वेल्हे, ता. ३ : अजित पवार यांच्या बंडामुळे वेल्हे तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादीला या बंडाचा मोठा फटका बसणार आहे. त्यातून पक्ष कमकुवत होणार असल्याचे चित्र समोर येत आहे.
शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांना मानणारा मोठा वर्ग वेल्हे तालुक्यात आहे. मात्र, पक्षाला गेल्या दहा वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या दोन जागांवर व पंचायत समितीच्या चार जागांवर सपशेल पराभव स्वीकारावा लागला आहे. एकही जागा जिंकता आली नाही. तालुक्यातील राष्ट्रवादीचे मतदार व सामान्य कार्यकर्ते हे जागेवरच आहेत, परंतु स्टेजवर बसणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची मोठी हानी झाल्याचे समोर आले आहे. त्यातच सुप्रिया सुळे मानणारा एक गट; तर अजित पवार यांना मानणारा दुसरा गट तालुक्यामध्ये अस्तित्वात होता.
तालुक्यातील अंतर्गत गटबाजीच्या कलहाची नोंद खुद्द अजित पवार यांनीच घेत स्थानिक नेत्यांना तंबी दिली होती. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकही उमेदवार जिंकला नसला तरीसुद्धा जिल्हा बँकेवर एक बिनविरोध संचालक निवडून आले असतानाही महिला प्रतिनिधी म्हणून वेल्ह्यात पहिल्यांदाच जिल्हा बँकेचे दुसरे संचालकपद देण्यात आले होते, तर पीएमआरडी सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा येथे उमेदवारी देण्यात आली होती, ते सदस्य निवडून आले होते. त्यानंतर कात्रज दूध संघाचे अध्यक्षपदसुद्धा वेल्हे तालुक्यातच दिले.

इतर पक्षांसाठी लाभदायक
महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना वेल्हे तालुक्याच्या विकासामध्ये झुकते माप देऊन कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली. मात्र, आता पक्षातील गटबाजीला पुन्हा उधाण येण्याची चिन्ह दिसत आहेत. अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. ते वेट अँड वॉच भूमिकेत आहेत. मात्र, पक्ष पुन्हा खिळखळीत होणार असल्याचे स्पष्ट चित्र जाणवत आहे. त्याचा फायदा तालुक्यातील इतर पक्षांना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.