करंजावणे येथे दोन म्हशींचा 
विजेचा शॉक बसून मृत्यू

करंजावणे येथे दोन म्हशींचा विजेचा शॉक बसून मृत्यू

वेल्हे, ता. ९ : करंजावणे (ता. राजगड) येथील राजू मनोहर शिंदे या शेतकऱ्याच्या दोन म्हशींचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. रविवार (ता. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या घटनेत सुदैवाने शेतकऱ्याचे प्राण वाचले. मात्र, दोन दुभत्या म्हशी गेल्याने शेतकऱ्याचे दोन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे करंजावणे हद्दीतील गुंजवणी नदी शेजारून मार्गासनीकडे जाणाऱ्या कृषिपंपाच्या विद्युत लाइनवर झाड पडल्याने खांब वाकून यामधील एक तार तुटल्याने विद्युत प्रवाह खांबावर खाली व परिसरात पसरला होता. सायंकाळी शेतकरी राजू शिंदे हे जनावरांना पाणी पाजल्यानंतर घराकडे घेऊन जात असताना दोन म्हशी या खांबाच्या जवळ गेल्याने त्यांना विजेचा शॉक बसला व त्या ठिकाणी त्या तडफडून दगावल्या. दरम्यान, मागे राहिलेल्या दोन म्हशी घेऊन शिंदे यांना या म्हशी पडलेल्या दिसल्याने ते जवळ जात असताना त्यांना विजेचा शॉक बसल्याने ते बाजूला झाले व ते इतर दोन जनावरे सुदैवाने बचावले.
या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वायरमन मंगेश सुतार, तन्वीर शेख, बाळू दीक्षित, उदय तळेकर यांनी तत्काळ परिसरातील विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी महावितरणचे शाखा अभियंता विठ्ठल भरेकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत पंचनामा केला. यावेळी उपसरपंच आनंद शिंदे, सुरेश शिंदे, प्रशांत शिंदे, विशाल शिंदे, आदी शेतकरी उपस्थित होते.
महावितरणचे शाखा अभियंता विठ्ठल भरेकर म्हणाले, ‘‘घटना दुर्दैवी असून, यासंदर्भात पंचनामा केला असून तत्काळ मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल.’’ महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून राजगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले असून, तारा तुटल्याच्या घटना घडत आहे. सर्व शेतकऱ्यांनी स्वतःसह त्यांच्या जनावराची काळजी घेणे गरजेचे आहे. वाकलेले खांब व तुटलेल्या तारा नागरिकांना निदर्शनास आल्यास त्यांनी महावितरण कार्यालयाशी तत्काळ संपर्क करावा.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com