राजगडमधील दोनही गटांत चुरशीच्या लढती रंगणार
वेल्हे, ता. १४ : राजगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे दोन गट आहेत. यामध्ये विंझर गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण पडल्याने या ठिकाणी मोठी चुरस पहावयास मिळणार आहे, तर वेल्हे बुद्रुक गटात नागरिकांचा मागास प्रवर्गास आरक्षण जाहीर झाले असले तरी सर्व पक्षात कार्यरत असलेल्या मूळ ओबीसींना पक्ष तिकीट देणार की कुणबीचे दाखले काढलेल्या मराठा समाजातील व्यक्तीला पक्ष तिकीट देणार, याकडे लक्ष लागले आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर विजय संपादन केला होता, मात्र थोपटे यांनी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप त्यांच्या नेतृत्वाखाली राजगड तालुक्यामध्ये तिकीट वाटप करण्याची दाट शक्यता आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शंकर मांडेकर हे परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत.
विंझर गट सर्वसाधारणसाठी आहे. येथे मोठी चुरशीची लढत होण्याचे चित्र पहावयास मिळणार आहे. सलग दोन पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून नलावडे घराण्यामध्ये सत्ता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश केला आहे. या गटामधून अमोल नलावडे, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर व त्यांचे चिरंजीव व माजी उपसभापती अनंता दारवटकर, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर, अंकुश पासलकर, लाला रेणुसे, राजू रेणुसे, शिवराज शेंडकर, देविदास हनमघर, गणेश जागडे, नाना राऊत, अंकुश दसवडकर, आदी इच्छुक आहेत.
वेल्हे बुद्रुक गट हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या ठिकाणी मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी कुणबीचे प्रमाणपत्र काढल्याने मूळ ओबीसींना तिकीट मिळणार का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या गटामधून माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, राजगड कारखान्याचे संचालक संदीप नगिने, माजी सभापती दिनकर सरपाले संदीप खुटवड, गोपाळ इंगुळकर, आनंद देशमाने, संतोष रेणुसे, गोरक्ष भुरुक, दत्ता देशमाने, रमेश शिंदे, आदींसह अनेक जण इच्छुक आहेत.
गटनिहाय आरक्षण
विंझर : सर्वसाधारण, वेल्हे बुद्रुक : नागरिकांचा मागास प्रवर्ग
मागील पक्षीय बलाबल
कॉंग्रेस- २
समस्या
वर्षानुवर्षे मढेघाट रस्ता प्रलंबित, किल्ले तोरणा व राजगड पर्यटनाबाबत अनास्था, वेल्हे- चेलाडी रस्ता, रोजगार प्रश्न, तालुक्यातील तरुणांची स्थलांतर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.