मद्याच्या नशेत पोहण्यासाठी गेला अन् बुडाला

मद्याच्या नशेत पोहण्यासाठी गेला अन् बुडाला

Published on

वेल्हे, ता. १८ : पानशेत धरणात मद्याच्या नशेमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या ३० युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.१७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली असून याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १८) आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सद्दाम चाँद व्हसुरे (वय ३० रा. नांदेड सिटी, हवेली) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मित्र नितीन राजेंद्र पुंड (रा. पाथरूड, ता.भूम, जि. उस्मानाबाद) यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी सांगितले की प्रकाश माळी, अनिल ओवाळ, राहुल गायकवाड, सद्दाम व्हसुरे हे चौघे मित्र राहुल गायकवाड यांच्या मोटारीने प्रकाश माळी यांची सासुरवाडी राजगड तालुक्यातील माणगाव येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथे त्यांची सासरी भेट दिल्यानंतर मित्र पानशेत धरणाच्या बाजूला जाऊन भेळ खात होते. दरम्यान, त्यांनी मद्यप्राशनही सुरू केले. त्याचवेळी मद्यप्राशन करून व्हसुरे हे धरणामध्ये खोल पाण्यात पोहण्यासाठी गेला, त्यावेळी त्याला दम लागून पाण्यामध्ये बुडाला. प्रकाश माळी यास पोहता येत असल्याने त्याने व्हसुरे यास पाण्याच्या बाहेर काढले त्यावेळी तो बेशुद्ध होता. सर्वांनी पानशेत पोलिस दूरक्षेत्र येथे येऊन घटनेबाबत पोलिसांना खबर दिली. घटना घडल्या ठिकाणी पोलिस आल्यानंतर व्हसुरे यास वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. पुढील तपास वेल्हेचे प्रभारी अधिकारी साहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोघे करीत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com