अवजड वाहनामुळे कोसळला पूल
वेल्हे, ता.२० : कोदवडी (ता. राजगड) येथील गुंजवणी नदीवरील पदबाबा मोरी ते कोदवडी मार्गावरील जीर्ण लोखंडी पूल अवजड वाहनामुळे कोसळला. ही घटना शनिवारी (ता.२०) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. हा पूल १९ जून २०२५ वाहतुकीसाठी बंद केला होता. असे असतानाही अवजड वाहतूक सुरू ठेवल्याने अखेर हा पूल कोसळला. यामुळे परिसरातील २५ पेक्षा अधिक गावांचा वाहतुकीसाठी संपर्क तुटला आहे.
कोदवडी पुलावरून दोन ब्रासपेक्षा अधिक डबर घेऊन जाणारा आयशर कंपनीचा डंपर क्रमांक एम.एच. १२ व्हीटी -६१३९ या पुलावरून जात होता. डंपर मधोमध गेल्यानंतर पूल तुटून वाहनासह गुंजवणी नदीत कोसळला. यामध्ये वाहनाचा चालक राजू तानाजी मिंडे (रा. कोदवडी ता.राजगड) हा किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती वेल्हे पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांनी भेट दिली व नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची जीर्ण अवस्था झाली होती. देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे पुलावर दुर्घटनेची टांगती तलवार लटकत होती. हा पूल गंजलेल्या अवस्थेत होता. त्याच्या संरचनेला भेगा पडल्या होत्या. त्यामुळे परिसरातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी आमदार व खासदारांकडे या पुलाच्या दुरुस्तीची वेळोवेळी मागणी केली होती, अशी माहिती सुरवडचे सरपंच अशोक सरपाले, दामगुडे आसनीचे माजी सरपंच विश्वास दामगुडे, कोदवडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमित माने, यांच्यासह परिसरातील अनेक सरपंचांनी माहिती दिली.
विद्यार्थी, चाकरमानी पर्यटकांना फटका
राजगड तालुक्यातील गुंजवणी नदीच्या उजव्या तीरावर असणाऱ्या कोदवडी, मंजाई आसनी, दामगुडा आसनी, सुरवड, वडगाव झांजे, सोंडे कारला, सोंडे माथना, जाधव सोंडे, भागीनघर तसेच भोर तालुक्यातील भाटघर धरण परिसरातील कुरंजी, करंदी, खेडेबारे, वाकांबे, वाढांबे या गावांना वेल्हे चेलाडी राज्य मार्गाला जोडणारा महत्त्वाचा लोखंडी पूल होता. या पुलावरून अनेक स्थानिक नागरिक, विद्यार्थी, चाकरमानी पर्यटक दररोज प्रवास करत होते.
वाहनास बंदीच्या फलकाकडे दुर्लक्ष
सर्व वाहनांस बंदी असल्याचा फलक जिल्हा परिषदेच्या पुणे कार्यकारी अभियंता बांधकाम उत्तर विभागाच्या वतीने लावण्यात आला होता. मात्र, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. पुलावरून सर्रास अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने तसेच प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर हा पूल कोसळला. या घटनेमुळे दुचाकी तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पर्यायी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
03401
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

