‘पक्षश्रेष्ठींचा निर्णय माझ्यासाठी अंतिम’

‘पक्षश्रेष्ठींचा निर्णय माझ्यासाठी अंतिम’

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर विधानसभा मतदारसंघात आमदार दत्तात्रेय भरणे व त्यांचे विरोध तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र प्रचार करत आहेत. या बदलत्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत...

- राजकुमार थोरात, वालचंदनगर

प्रश्‍न : इंदापूर तालुक्यामध्ये भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस खरोखर एकत्र आले आहेत का?
उत्तर- राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. आमचे नेते अजित पवार आहेत. भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आहे. दोन्ही पक्षाचे नेत्याचे मनोमिलन झाले आहे. दोघेही राज्याच्या विकासासाठी एकत्र काम करीत आहे. आम्ही नेत्यांचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत. नेत्यांनी महायुतीचे काम करण्याचा आदेश असून, आम्ही दोघेही एकत्र महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी काम करीत असून, इंदापूरमध्ये भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकदिलाने कार्यरत आहेत. इंदापूर तालुक्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी आम्ही एकत्र काम करीत असून, केंद्र सरकारच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्‍न सोडविणार आहोत.

हर्षवर्धन पाटील यांनी पाठिंबा दिल्यामुळे तुमची राजकीय अडचण झाली आहे का?
- माझ्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. मी ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही. अजितदादांमुळे मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा संचालक व अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष होतो व ३० वर्षे संचालक आहे. इंदापूरचा दोन वेळा आमदार, सोलापूरचा पालकमंत्री व राज्याच्या सहा खात्याचा राज्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला. मी सुरवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. अजितदादांचा आदेश हा अंतिम आदेश मानतो. हर्षवर्धन पाटील यांनी पाठिंबा दिल्यामुळे माजी राजकीय अडचण होण्याचा प्रश्‍नच नाही. येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठींचा निर्णय हा माझ्यासाठी अंतिम निर्णय राहील.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे मनाने तुमच्या सोबत आहे का?
- सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांच्यासह माने कुटुंबाचे व माझे घरगुती सलोख्याचे संबंध आहेत. सन २०१४ व सन २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझे प्रमुख प्रचारक मानेदादा होते. आमच्यात कसलेही मतभेद नाही. प्रवीण माने हे ही पवार कुटुंबाला मानणारे आहे. अजित पवार व माने कुटुंबाचे सलोख्याचे संबंध असून, आम्ही दोघे व कुटुंबातील सदस्य मनाने एकच आहेत. विरोधक गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत असतात.

इंदापूर तालुक्यात मोठ्या नेत्यांच्या सभेचे नियोजन आहे का?
-इंदापूर तालुक्यामध्ये सध्या महायुतीच्या संयुक्त सभा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदचे माजी सभापती प्रवीण माने यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हजेरी लावत आहेत. तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सांगता सभेला अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

इंदापुरात महायुतीसोबत नेते आहेत, जनता नाही, अशी चर्चा सुरू आहे...
- विरोधक नेहमी उलटसुलट चर्चा करण्याचे काम करत असतात. माझ्यासह महायुतीच्या नेत्यांची जनतेशी नाळ जोडली आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. दररोज जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु असतो. विरोधकांचे काम नेहमी टीका करून अफवा पसरविण्याचे आहे. इंदापुरातील जनता महायुतीच्या बाजूने असून, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना जास्तीजास्त मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com