अश्‍व धावले वायु वेगाने! रिंगण सोहळ्यामध्ये चैतन्य पसरले!!

अश्‍व धावले वायु वेगाने! रिंगण सोहळ्यामध्ये चैतन्य पसरले!!

वालचंदनगर, ता. ८ : ‘‘अश्‍व धावले वायु वेगाने...रिंगण सोहळ्यामध्ये चैतन्य पसरले’ या उक्तीप्रमाणे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे गोल रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे उत्साहात पार पडले. रिंगण सोहळ्याने वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूमधून निघाल्यानंतर पहिले मानाचे गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावामध्ये होते. सणसरचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा बेलवाडीकडे मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा बेलवाडी गावामध्ये पोहचला. सकाळपासून वारकऱ्यांनी व पंचक्रोशीमधील नागरिकांनी पालखी तळावर रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
रथाच्या मागे व पुढील सर्व दिंड्या पालखी तळावरती पोहचल्यानतंर रिंगण सोहळ्याला सुरवात केली. मानाच्या अश्‍वाचे पूजन करून ज्ञानेश्‍वर तुकारामाच्या जयघोषामध्ये रिंगण सोहळ्याला सुरवात झाली. बेलवाडीमधील मेंढ्यांनी तुकोबाच्या पालखीला पहिली प्रदक्षिणा घालून रिंगण सोहळ्याला सुरवात केली. रिंगण सोहळ्यामध्ये पताकावाले धावत असताना सोहळ्यामध्ये चैतन्य पसरले. महिलाही डोक्यावरती तुळस घेऊन धावत होत्या. विणेकरी, टाळ- मृदृंगवाले देहभान विसरुन रिंगण सोहळ्यामध्ये धावत होते.
पालखी सोहळ्याचे मानानाचे अश्‍वांच्या फेऱ्याची उत्कंठा वैष्णवांना लागली होती. अश्‍वांनी वायू वेगाने रिंगण सोहळ्याला चार फेऱ्या मारुन रिंगण पूर्ण केल्यानंतर ज्ञानेश्‍वर -तुकारामांच्या जयघोषाने आसमंत दणाणला. लाखो डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पाहून अविस्मरणीय होता. रिंगण सोहळ्यानंतर अश्‍वांच्या पायाखालची धुळ मस्तकाला लावण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली. फुगडीसह अनेक खेळ खेळण्यामध्ये वैष्णव दंग झाले होते.
यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नेचर उद्योग समुहाचे अध्यक्ष अर्जुन देसाई, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव जामदार, माजी संचालक कांतिलाल जामदार, बेलवाडीच्या सरपंच मयूरी जामदार, अंकुश जामदार, अॅड. शरद जामदार, दादासाहेब गायकवाड, अमोल भोईटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com