

खळद, ता. ९ : शिखर शिंगणापूर (जि. सातारा) येथे मानाच्या खळद, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने मुंगी घाट मानवी साखळीच्या साह्याने सर केला. भुतोजीबुवा तेली यांचे वंशज नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत अवघड घाट पार करत शंभू महादेवाला कऱ्हेच्या जलाने अभिषेक घातला.
रामनवमीला (ता. ६) एखतपूर (ता. पुरंदर) येथील कावड सोहळा कोळविहिरे, जोगवडी, वडगाव निंबाळकर, जिंती, फलटण, निंबळक नाका असा प्रवास करत बुधवारी (ता. ९) पहाटे रणखिळा येथून सकाळी कोथळे येथे पोहोचला. प्रशासनाच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तर नानासाहेब तेली महाराज (इस्लामपूर) यांच्या कावडीची भेट तसेच लहान मोठ्या काठ्या कावडी यांची भेट होऊन दुपारी २ वाजता कावडीचे मुंगीघाटाकडे मार्गस्थ झाली. घाट पायथ्याशी माजी आमदार संजय जगताप यांनी कावडीचे स्वागत केले. यानंतर महाआरती होऊन कावडीचा घाट चढण्यास प्रारंभ झाला.
ढोल ताशांच्या गजरात, सनईच्या निनादात दोराशिवाय केवळ मानवी साखळीच्या साह्याने ‘हर हर महादेव’चा जयघोष करत घाटाची चढण पार केली. हा क्षण पाहण्यासाठी घाट माथ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. कावडीचे स्वागत उपविभागीय महसूल अधिकारी उज्वला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार विकास अहीर, माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, दहिवडी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, अक्षय सोनवणे, दत्तात्रेय झुरंगे, देविदास कामथे यांनी केले. कावड प्रथम अमृतेश्वर मंदिर आणि नंतर मुख्य मंदिरात नेऊन कऱ्हेचा जलाभिषेक केला.
यात्रेची आख्यायिका
संत भुतोजी तेली महाराज राहत्या घराला आग लावून शिखर शिंगणापूर यात्रेस कावड घेऊन बिना दोराने मुंगी घाट चढत असे. यात्रेवरून घरी परतल्यानंतर त्यांचे घर पूर्वीप्रमाणे जसेच्यातसे असायचे, हा चमत्कार सांगितला जातो. ही कावडीची परंपरा पंचक्रोशीतील शिवभक्तांनी पुढे सुरू ठेवली आहे. संत भुतोजी तेली यांची समाधी, जळत्या घराची जागा आणि तेलाचा घाणा आजही एखतपूर (ता. पुरंदर) आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.