वाल्ह्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’चा संदेश

वाल्ह्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’चा संदेश

Published on

वाल्हे, ता. २१ : वाल्हे (ता.पुरंदर) परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा-राज्याचा भाद्रपदी बैलपोळा सण मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा केला. सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार यांच्या पुढाकाराने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ या शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमाचा संदेश बैलांच्या पाठीवर लिहून जनजागृती करत अनोखा उपक्रम राबविला.
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ‘सन्मान कष्टकरी बळीराजाचा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतून शेतकऱ्यांचा, त्यांच्या कष्टांचा व त्यांच्यासोबत असलेल्या बैलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, दौंडज, पिंगोरी आदि परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीने लाडक्या सर्जा-राजाचा भाद्रपद बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी लम्पी ने शिरकाव केल्याने यावर्षी बैलांच्या मिरवणुकींशिवाय घरोघरी शांततेत पण उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी मातीने बनविलेल्या बैलांचे पूजन करण्यात आले. वाजतगाजत मिरवणुका जरी शेतकऱ्यांनी काढल्या नसल्या तरी बैलपोळा साजरा करण्याबाबत घरातील बच्चे कंपनीत मात्र उत्साह होता. बच्चे कंपनीने बैलांना सजवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र होते. शिंगांना घेरूने रंगवून बेगड, फुगे लावून बैलांना सजवल्याचे दिसले.
सरपंच संदेश पवार यांनी यावेळी सांगितले कि, बैलपोळा हा फक्त सण नसून कष्टकरी बळीराजाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. यावर्षी आम्ही बैलांच्या पाठीवर ''मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान''चा संदेश लिहून शासनाच्या योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे या अभियानाच्या विविध घोषणांचे फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली.
दरम्यान, यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने येथील बैलजोडी मालक संतोष पवार, विक्रम पवार, नवनाथ पवार, माणिक दाते, देवेंद्र सातपुते, तुषार पवार आदि बळीराजांचा सन्मान करत कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी राहुल यादव, उपसरपंच नितीन गावडे, धनंजय पवार, अशोकमहाराज पवार, राजेंद्र चिकणे, नारायण पवार, दिलीप पवार, शशिकांत दाते, महादेव पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मुंबई येथील युनायटेड कंपनी च्या वतीने बैल मालकांना विविध झाडांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, राहुल यादव यांनी आभार मानले.

05285

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com