वाल्हेत पाडव्याला रंगणार ‘सुर संगम’ची सुरावट
वाल्हे, ता. १८ : दिवाळी पाडव्याच्या पहाटेला सूर, ताल आणि भक्तीचा संगम अनुभवण्यासाठी वाल्हे येथे ‘सूर संगम’ या संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे पाचव्या वर्षी सलग या कार्यक्रमाचे आयोजन होत असून, स्थानिक आणि नामवंत कलाकारांच्या सादरीकरणातून श्रोत्यांना सुरांची पर्वणी लाभणार आहे. संगीताच्या या मेजवानीत भक्तीगीते, लोकगीते, भावगीते तसेच जुन्या मराठी-हिंदी चित्रपटातील गाणी सादर केली जाणार आहेत.
ही दिवाळी पहाट बुधवारी (ता. २२) पहाटे ५.३० वाजता रंगणार असून, गायक गणेश मोरे यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या या ‘सूर संगम’ मैफलीत ‘सारेगमप फेम’ ज्ञानेश्वर मेश्राम तसेच प्रज्ञा गौरकर, दिव्या तिवारी, मयुरेश वाघ आणि गणेश मोरे यांचे सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे. या मैफलीत पंडित राजू जावळकर, सुनील जाधव, प्रवीण जाधव, हर्षल गुलाणी साथसंगत करणार असून, निवेदन महेश गायकवाड यांचे तर ध्वनी संयोजन राहुल जावळेकर यांचे असणार आहे. कार्यक्रमात भक्ती, भावगीतांचा सुरेख संगम अनुभवता येणार आहे. असे रायगडचे उपजिल्हाधिकारी आणि वाल्हे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के यांनी सांगितले.
या वर्षी ही संगीतमय दिवाळी पहाट पाचव्या वर्षी साजरी होत असून, आद्यरामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्यी समाधीस्थळ असलेल्या वाल्मीकनगरी वाल्हे येथे ही परंपरा अधिकच बहरत आहे. गावातील नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्साह असून ग्रामीण भागात अशी सुरेल दिवाळी पहाट हे एक आगळंवेगळं आकर्षण ठरत असल्याचे ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार यांनी सांगितले.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी श्री भैरवनाथ मंदिरात अभिषेक, महापूजा आणि आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तसेच परिसरात रांगोळी रेखाटण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव शशिकांत दाते, पुजारी सचिन आगलावे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.