आदर्श गावाची एकजूट प्रशासनापर्यंत पोहोचली
वाल्हे, ता. २७ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आडाचीवाडी (ता. पुरंदर) गावाने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली असतानाही पुरंदर पंचायत समितीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यावर तीन दिवसांत कारवाई न झाल्यास गाव या अभियानातून माघार घेईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. या संदर्भात दैनिक सकाळने ‘आदर्श गावाचा प्रशासनाला विसर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. २६) आडाचीवाडीला भेट देऊन अभियानातील कामांचा सविस्तर आढावा घेतला.
सोमवारी (ता. २७) सकाळी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे पथक आडाचीवाडी येथे दाखल झाले. यावेळी गटविकास अधिकारी प्रणोती श्रीशाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय गीते, महेंद्र गिरमे, विस्तार अधिकारी अभिजित जेधे, अजित कोकरे, संजय बडदे तसेच ग्रामसेवक अनिल हिरास्कर उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत अभियानातील प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. उपमुख्यकार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी ग्रामस्थांच्या नाराजीची दखल घेत आवश्यक ती कारवाई व सहकार्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.
या भेटीदरम्यान येथील रहिवासी व रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच मोहन पवार, सूर्यकांत पवार, अभिजित पवार, अमित शिर्के, विक्रम पवार, शकुंतला पवार, लता पवार, अलका पवार, हनुमंत पवार, अरविंद पवार, नीता पवार आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपमुख्यकार्यकारी अधिकारी भूषण जोशी म्हणाले की, ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट आणि प्रगतीची दृष्टी प्रेरणादायी आहे. आडाचीवाडीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे खरे उद्दिष्ट साकारले आहे. प्रशासनाकडून गावाच्या प्रगतीसाठी पूर्ण सहकार्य मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू.
गावाच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दैनिक सकाळने केलेल्या वृत्तांकनामुळेच आज अधिकाऱ्यांची गावभेट घडली. त्यामुळे आमचा आवाज जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचला.
- सुवर्णा पवार, सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

