ज्योतिर्लिंग, ज्योतिबाच्या उत्सव मूर्तींना स्नान

ज्योतिर्लिंग, ज्योतिबाच्या उत्सव मूर्तींना स्नान

Published on

वाल्हे, ता. १ : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील काटेबारस यात्रेचा उत्सवी जल्लोष शिगेला पोहोचला आहे. प्रथेप्रमाणे रविवारी (ता. २) बाराव्या दिवशी काटेमोडवनची मुख्य यात्रा होणार आहे. परंपरेप्रमाणे शनिवारी (ता. १) कार्तिक एकादशीनिमित्त देवाची काठी, ज्योतिर्लिंगाच्या तसेच ज्योतिबाच्या उत्सवमूर्तींना नीरा नदीत भाविकांच्या उपस्थितीत स्नान घालण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’, ‘जय ज्योतिबा’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
अकरा दिवसांपासून गुळुंचे येथे विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, छबिना, तसेच १२ दिवसांचा उपवास सुरू असून रविवारी (ता. २) काटेमोडवनाने या धार्मिक उत्सवाची सांगता होणार आहे. प्रथेप्रमाणे शुक्रवारी (ता. ३१) रात्री गावात देवाची बहीण समजल्या जाणाऱ्या काठीने प्रवेश केला.
त्यानंतर पालखीची सवाद्य नगरप्रदक्षिणा झाली. यावेळी पालखी व मानाची काठी गावातील सर्व भागातून फिरविण्यात आली. ठिकठिकाणी पालखीचे फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या काढून आतषबाजीत स्वागत करण्यात आले. घरोघरी महिलांनी पालखीतील उत्सव मूर्तीची पूजा केली.
नगरप्रदक्षिणेसह छबिन्याचा कार्यक्रम पहाटेपर्यंत सुरूच होता. शनिवारी (ता. १) सकाळी अभिषेक आणि आरती झाल्यानंतर ग्रामस्थ, यात्रा कमिटीचे पंच तसेच भाविकांनी अकरा वाजता ढोल ताशांच्या गजरात पालखी मंदिरा बाहेर काढली. कर्नलवाडी येथून ज्योतिबा देवाची पालखी पानाफुलांनी सजवलेल्या रथातून आल्यानंतर गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग महाराज आणि मानाची काठी रथातून निरेकडे निघाल्या.
नीरा स्नानासाठी पालखीबरोबर गुळुंचे, नीरा, कर्नलवाडी व बारा वाड्यावस्त्यांवरुन अनेक भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकी दरम्यान ध्वनिवर्धकाच्या निनादात आतषबाजीसह गुलालाची उधळण करण्यात आली. नीरा दत्त घाटावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धार्मिक विधी पार पडल्यानंतर मोठ्या श्रद्धेने अगोदर मानाची काठी आणि त्यानंतर श्री ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा यांच्या उत्सवमूर्तींना रिमझिम पावसाच्या वर्षावामध्ये भाविकांच्या हस्ते निरेचे स्नान घालण्यात आले. यावेळी नीरा दत्त घाट परिसर भक्तांनी फुलून गेला होता. नीरा, गुळुंचे, कर्नलवाडी तसेच आसपासच्या वाड्यावस्त्यांतील भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला.
पालखीच्या स्वागतासाठी नीरा शहरांतर्गत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांनी उत्सवमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. भक्तीभाव, उत्साह आणि पारंपरिक जल्लोषाने गुळुंचे, नीरा परिसर दुमदुमून गेला होता.

Marathi News Esakal
www.esakal.com