गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा बंद

गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा बंद

Published on

वाल्हे, ता. ९ : वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात गुंजवणीच्या प्रकल्पावर प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनीद्वारे ठिबक सिंचन पद्धतीच्या कामाला प्रारंभ झाला होता. मात्र, सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी ठरल्यानुसार सर्व्हेप्रमाणे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
सध्या सुरू असलेल्या गुंजवणी प्रकल्पाच्या कामकाजाबाबत रविवारी (ता. ९) सकाळी शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर शेतकऱ्यांनी आक्रमक होत प्रकल्पस्थळी जाऊन परिसरात सुरू असलेले काम बंद पाडले. संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे याबाबत माहिती देत काम थांबविण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून गुंजवणी प्रकल्पावर प्रायोगिक तत्त्वावर बंद जलवाहिनीद्वारे ठिबक सिंचन पद्धतीचे काम सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांचा
विश्वास न जपता, वर्ष १९९३ च्या सर्वेक्षणानुसार दिशा न ठरवता कंपनीने मनमानी पद्धतीने काम सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले. रविवारी शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम बंद केले. जुन्या सर्वेनुसार गुंजवणी धरणातून वाल्हे परिसराला बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार होता. मात्र, सध्याच्या नियोजनात त्या सर्व्हेचा विचार केला नसल्याने बापसाईवस्ती, पवारवाडी, वागदरवाडी, गायकवाडवाडी, बहिर्जीचीवाडी, सुकलवाडी, राख, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी आदी शेतीक्षेत्र धोक्यात येऊ शकतात, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. चुकीच्या रचनेमुळे सर्व क्षेत्रांना समान प्रमाणात पाणी मिळणार नाही, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामस्थांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार विजय शिवतारे व माजी आमदार संजय जगताप यांना निवेदन पाठविण्याचे जाहीर केले.
याप्रसंगी सचिन लंबाते, अॅड. फत्तेसिंग पवार, बाळासाहेब राऊत, समदास राऊत, गिरीश पवार, आतिश जगताप, बाळासाहेब भुजबळ, तुषार भुजबळ, रणसिंग पवार, मदन भुजबळ, माणिक पवार, शिरीष नवले, उमेश पवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुंजवणी प्रकल्पासाठी ३० वर्षांपूर्वी आमच्या जमिनी अधिग्रहीत करून शिक्के मारले. पण रविवारी योजना पूर्णत्वाला जात असताना पाणीवाटपात राजकारण सुरू आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. राजकीय दबावाखाली न येता वर्ष १९९३ च्या सर्वेनुसार काम झाले तर शेवटच्या वाडीवस्तीपर्यंत पाणी पोहोचेल.
- फत्तेसिंग पवार/ बाळासाहेब राऊत

शेतकऱ्यांच्या मागण्या
पश्चिम- उत्तर भागातील वाडी व वस्त्यांपर्यंत पाणी पोहचावे.
राजकीय दबावाखाली न येता योग्य सर्वेक्षणानुसार काम करावे.
परिसरातील शेवटच्या वाडीवस्तीपर्यंत पाणीपुरवठा सुनिश्चित करावा.
गुंजवणी प्रकल्पाच्या योजनेमुळे खऱ्या अर्थाने शेती समृद्ध व्हावी.

उपोषण इशारा
गुंजवणी प्रकल्पाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे आणि पाणीवाटपात असमानता आहे. वर्ष १९९३ च्या सर्वेक्षणानुसार काम करून लाभक्षेत्रातील सर्व वाडीवस्त्यांपर्यंत पाणी पोचवावे. तसे न झाल्यास वाल्हे येथे मंगळवारपासून (ता. १८) प्राणांतिक उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

05724

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com