रेशनिंग दुकानांमधून निकृष्ट दर्जाची ज्वारी
वाल्हे, ता. २१ : केंद्र सरकारच्या निर्णयानुसार नोव्हेंबर २०२५ पासून पुणे जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमधून केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेंतर्गत गहू, तांदळासोबत मोफत ज्वारीचे वितरण नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. या योजनेतून गरजू व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असला तरी ज्वारीच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक रेशन दुकानांतून काही लाभार्थ्यांना चांगली ज्वारी मिळत असताना, अनेकांना निकृष्ट दर्जाची ज्वारी मिळत असल्याची तक्रार समोर येत आहे.
ग्रामीण भागातील रेशन दुकानांवर नागरिक मोठ्या अपेक्षेने ज्वारीसाठी गर्दी करत आहेत, मात्र अनेक ठिकाणी ज्वारीचा दर्जा निकृष्ट, जाळीदार, बारीक व रंग काळसर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही नागरिकांनी ही ज्वारी घेण्यास नकार दिला असून, फुकट असली तरी खाण्यायोग्य नसेल तर उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला आहे. पाठवलेल्या पोत्यांमध्येच दर्जाचा फरक असल्याने, एखाद्या पोत्यातील ज्वारी स्वच्छ आणि खाण्यायोग्य तर दुसऱ्या पोत्यातील धान्य खवखवट, बारीक व जाळीयुक्त असल्याचे दिसत आहे. यामुळे एकाच योजनेत मिळणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांत संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन सर्व लाभार्थ्यांना समांतर दर्जाचीच ज्वारी मिळेल, याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान याबाबत पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
योजनेनिहाय मोफत मिळत असलेले धान्य
अंत्योदय : दर महिन्याला गहू ८ किलो, ज्वारी ७ किलो, आणि तांदूळ २० किलो
प्राधान्य कुटुंब : कुटुंबातील प्रती माणसी १ किलो गहू, १ किलो ज्वारी, ३ किलो तांदूळ
ग्रामीण भागात ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून, दररोज लाभार्थी ज्वारीसाठी येत आहेत. मात्र ज्वारीच्या दर्जाबाबत काही ग्राहक चांगली तर काही ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
- सविता दुर्वे, रेशनिंग दुकानदार, नीरा
लाभार्थी म्हणतात की...
गहू आणि तांदूळ चांगल्या प्रतीचा मिळत असला तरी ज्वारी योग्य प्रकारची नाही. घरातील लहान मुले, वृद्ध यांना खायला अयोग्य वाटत आहे. शासनाने हा उपक्रम सुरू करून स्तुत्य पाऊल उचलले असले तरी ज्वारीचा दर्जा सुधारण्याची मागणी जोर धरत आहे. निकृष्ट धान्याऐवजी उपयुक्त आणि खाण्यायोग्य ज्वारी मिळावी, अशी अपेक्षा विनय शहा, अस्लम शेख, सुनील चव्हाण यांसह लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
WHL25B05789 WHL25B05791

