सुकलवाडीचे विकासाच्या दिशेने पाऊल
वाल्हे, ता. ८ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला गती देत सुकलवाडीने विकासाच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाची सोशल मीडिया टीम सोमवार (ता. ८) गावात दाखल झाली. पुरंदरचे साहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पाहणी कार्यक्रमात गावातील विविध प्रकल्पांची सखोल तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोशल मीडिया टीमने गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा, गावांतर्गत रस्ते, व्यायामशाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी परसबाग, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी तसेच आरोग्य शिबिर यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. या सर्व उपक्रमांत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे आणि त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच सुकलवाडीतील विकास प्रगतिपथावर असल्याचे टीमने विशेष कौतुक केले. दरम्यान, यावेळी साहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश थोरात व सरपंच संदेश पवार यांच्या हस्ते ग्रामस्थांना डस्टबिन तसेच आरोग्य शिबिरामध्ये चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच धनंजय पवार, अशोकमहाराज पवार, दिलीप पवार, योगेश पवार, प्रतीक्षा चव्हाण, ऊर्मिला पवार, प्रतीक्षा चव्हाण, अश्विनी चव्हाण, वैजयंता दाते, सुवर्णा चव्हाण, माधुरी दाते, शर्मिला पवार, सुनील भोसले, देवराम सातपुते यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक सोनल जगदाळे यांनी आभार मानले.
गाव स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामस्थांनी उत्साहात स्वीकारला. समृद्ध पंचायतराज अभियानामुळे आपल्या गावची ओळख नव्या पातळीवर पोहोचणार असून गावात सुरू असलेल्या विकासकामांना नवीन गती मिळत आहे. सोशल मीडिया टीमच्या भेटीदरम्यान गावात उत्साही वातावरण होते. सुकलवाडीचे सर्वांगीण विकासस्वप्न साकार करण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ एकजुटीने कार्यरत आहेत. आगामी काळात अधिक दर्जेदार सुविधा गावात उपलब्ध करून देण्याचा आमचा निर्धार आहे.
़- संदेश पवार, सरपंच, सुकलवाडी
5940

