स्मशानभूमीच बनली अभ्यासिका
वाल्हे, ता. ११ : आडाचीवाडी (ता. पुरंदर) या छोट्याशा गावाने अवघ्या काही महिन्यांत विकासाची मोठी झेप घेत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, सामुदायिक उपक्रम या सर्वांसोबत गावची ‘स्मशानभूमी’ देखील आधुनिक, सुसज्ज पद्धतीने उभारली आहे. केवळ अंत्यविधीचे ठिकाण म्हणून ओळख असलेली स्मशानभूमी आज गावकऱ्यांसाठी भेटीगाठीचे, तर मुलांसाठी अभ्यासाचे केंद्र ठरत आहे. हीच आडाचीवाडीची वेगळी ओळख बनली आहे.
सामान्यतः भीती, शांतता आणि ओसाडपणा अशा प्रतिमांनी जोडली जाणारी स्मशानभूमी, आडाचीवाडीत मात्र पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसते.
स्वच्छ परिसर, आकर्षक फुलझाडे, बैठक व्यवस्था, प्रकाशयोजना, पाण्याची सोय यामुळे येथे सतत ग्रामस्थांची वर्दळ दिसते. दुपारचे जेवण उरकल्यावर गावातील अनेक ज्येष्ठ फिरण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी येथे थांबतात. काहीजण स्मशानभूमीतील सावलीत विसावा घेतात आणि नंतर घरी जातात. स्मशानभूमीत जाणे म्हणजे भीती नव्हे, शांतता मिळवणे असा अनेकांचा अनुभव होत आहे, असे गावकरी सांगतात. गेल्या काही दिवसांपासून येथील मुले- मुली दररोज संध्याकाळी स्मशानभूमीत दोन तास अभ्यास करण्यासाठी एकत्र जमत आहेत. गटागटाने बसून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणारी मुलांची ही दृश्ये पाहून येणाऱ्या ग्रामस्थांनाही आनंद होत आहे. स्मशानभूमीत अभ्यास करताना आम्हाला भीती वाटत नाही. उलट शांत वातावरणामुळे अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करता येतो, असे मुलांनी सांगितले.
आडाचीवाडीतील हा उपक्रम केवळ सौंदर्यीकरणाचा नाही, तर ग्रामभावना मजबूत करणारा आहे. स्मशानभूमीचा हा उपक्रम म्हणजे ग्रामविकासाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे. स्मशानभूमीला अशा सकारात्मक वापराशी जोडणं ही अत्यंत अभिनव कल्पना आहे. मृतसंस्काराच्या ठिकाणालाच शांत, सुरक्षित आणि लोकाभिमुख जागेत रूपांतरित केलं, ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. मुलांचं इथे अभ्यासासाठी येणं म्हणजे गावाने निर्माण केलेल्या सुरक्षित व निरोगी वातावरणाची साक्ष आहे.
- संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी, रायगड
ग्रामविकासाच्या दृष्टीने येथील रहिवासी व रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आडाचीवाडीने घेतलेली ही झेप
ग्रामस्थांच्या एकत्र प्रयत्नामुळे शक्य झाली आहे. स्मशानभूमीसह गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ, सुबक आणि उपयुक्त बनवण्याचा प्रयत्न केला. स्मशानभूमी ही गावाची ओळख नसते, पण ती स्वच्छ- सुसज्ज असेल तर गावाचा आदर वाढतो. वयस्कर ग्रामस्थ या ठिकाणी विरंगुळा, तर मुलं इथे अभ्यास करतात हे पाहून खूप समाधान मिळते.
- सुवर्णा बजरंग पवार, सरपंच
शाळेतून आल्यावर थकवा असतो, पण संध्याकाळी सगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत इथे बसून अभ्यास केला की तयारी छान होते. प्रकाश आणि
बसण्याची सोय चांगली आहे. आम्ही आता रोज संध्याकाळी दोन तास इथेच अभ्यास करण्याचा नियम केला आहे.
- सेजल पवार, विद्यार्थिनी
आयुष्यात इतकी स्वच्छ, नीटनेटकी स्मशानभूमी मी पाहिली नव्हती. दुपारी जेवून मी इथेच येतो, थोडा फेरफटका मारतो, सावलीत बसून आराम करतो. मुलं इथे अभ्यास करताना दिसतात, ते पाहून मनाला आनंद होतो. गावाने घेतलेली ही कल्पना खरंच कौतुकास्पद आहे.
- शरद जनार्दन पवार, ग्रामस्थ
05970
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

