वाल्ह्यात एसटी चालकांवर कारवाई
वाल्हे, ता. १३ : ‘वाल्हे परिसरातील प्रवाशांची गैरसोय’ या मथळ्याखाली दैनिक ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता.१०) वृत्त प्रसिद्ध होताच एसटी महामंडळाचे अधिकारी खडबडून जागे झाले अन् वाल्ह्यात एसटी न थांबविणाऱ्या चालकांवर कारवाई करीत ताकीद देण्यात आली आहे.
वाल्हे (ता. पुरंदर) येथून पुणे व नीरा दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी कोणताही अधिकृत एसटी थांबा नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व नोकरदार यांना महामार्गावरच जीव मुठीत धरून उभे राहावे लागत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या प्रवाशांच्या गैरसोयीबाबत ‘सकाळ’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एसटी प्रशासनाने तत्काळ याची दखल घेतली. पुणे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांच्या आदेशानुसार विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता. १३) दुपारपासून वाल्हे येथे एसटी प्रशासनाच्या पथकाने प्रत्यक्ष धडक कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान पुलावरून येणाऱ्या एसटी बसेस थांबवून चालकांना पुलाखालून येण्याबाबत ताकीद देण्यात आली. तसेच पुलावरून आलेल्या सर्व एसटी बसेसच्या नोंदी घेऊन त्या संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे साहाय्यक वाहतूक निरीक्षक एम. ए. शेख यांनी दिली. या पथकामध्ये साहाय्यक वाहतूक निरीक्षक विलास चौखंडे व बी. व्ही. जमदाडे यांचाही सहभाग होता. दुपारपासून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान दहा ते बारा एसटी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. सुधारणा न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पुण्याचे साहाय्यक वाहतूक निरीक्षक एम. ए.शेख यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, वाल्हे परिसरात कायमस्वरूपी अधिकृत एसटी थांबा उभारावा तसेच महामार्ग ओलांडताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाला सुरक्षित आणि सोईस्कर बनवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
5986
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

