दातेवाडी येथे वनराई बंधारा

दातेवाडी येथे वनराई बंधारा

Published on

वाल्हे, ता. १६ : वाल्हे (ता. पुरंदर) हद्दीतील दातेवाडी बंधारा परिसरामध्ये रविवारी (ता. १४) अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने सामाजिक उपक्रमांतर्गत वनराई बंधारा उभारण्यात आला. पावसाळ्यातील पाणी अडवून भूजल पातळी वाढविणे तसेच परिसरातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शिवाजीनगर परिसरातील हरकानगर येथील गणेश पेठमधील श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सेवा केंद्राच्या वतीने पर्यावरण संवर्धन, पाणी
अडवून पाण्याची पातळी वाढवणे तसेच ग्रामीण भागातील शेतीला आधार देणे, या उद्देशाने हा वनराई बंधारा बांधला. सिमेंटच्या पिशव्यांमध्ये माती भरून सर्व सेवेकरी व भक्तगणांनी श्रमदान करत अल्पवेळेत बंधाऱ्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले.
या उपक्रमात सुरेखा गायकवाड, स्वाती शेठ, अरुणा फाळके, कमल ढोरे, संध्या नांगरे, कमल धिवार, दीपक थेऊरकर, सखाराम धिवार, संतोष गायकवाड, दिशेन थेऊरकर, श्रीरंग हारवडे, सचिन वायाळ यांच्यासह अनेक भक्तगणांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी सदस्यांनी एकत्रितपणे श्रमदान करत पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पार पाडली.

वनराई बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविले जाणार असून परिसरातील विहिरी व बोअरवेल्सची पाणीपातळी वाढण्यास मदत
होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय होऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास हातभार लागणार आहे.

या सामाजिक उपक्रमाबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आयोजक व सहभागी सर्वांचे कौतुक केले. भविष्यातही अशा पर्यावरणपूरक व लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात यावे, अशी अपेक्षा सुरेखा गायकवाड यांनी व्यक्त केली.

Marathi News Esakal
www.esakal.com