आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
हिंजवडी जिल्हा परिषद गट
आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
जि ल्हा परिषदेचा हिंजवडी गट पुन्हा सर्वसाधारण (खुला) राहिल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. स्थानिक गट-तट आणि नातेसंबंधांच्या राजकारणामुळे पक्षांना उमेदवार निवडीत समीकरणे जुळवावी लागणार आहेत.
बेलाजी पात्रे
----------------------
मु ळशी तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष यंदाही आक्रमक आहे. माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे. भाजपही पूर्ण तयारीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र, जुन्या नव्याचा संगम साधून एकनिष्ठांना भाजप न्याय देणार का? याकडेही लक्ष असणार आहे.
तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीही निर्णायक ताकद आहे. युती न झाल्यास स्वतंत्र उमेदवार देऊन हा गट रंग भरण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी यंदाची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तगडा उमेदवार शोधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
गटात इच्छुकांची संख्या वाढली आहे. ग्रामभेटी, मतदार संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर भूमिका मांडून जनसंपर्क वाढवत आहेत. पक्षनिष्ठेसह वैयक्तिक संबंधांवरही भर दिला जात आहे. मात्र, एकाच जागेसाठी अनेक दावेदारांमुळे पक्षांची उमेदवारी निश्चितीची डोकेदुखी वाढली आहे. हिंजवडीतील तिहेरी लढत आणि स्थानिक राजकीय समीकरणे मुळशी तालुक्यातील राजकारणाची दिशा ठरवणार आहेत.
महत्त्वाची गावे
माण गण : माण, भोईरवाडी, घोटावडे, रिहे.
हिंजवडी गण: हिंजवडी, मारुंजी, कासारसाई, जांबे.

