दिव्यांगांना आधारसाठी मिळणार ‘आधार’
बेलाजी पात्रे
सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. ३ : अनेक दिव्यांग नागरिक शारीरिक मर्यादांमुळे आधार कार्डसाठी पडताळणी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे अर्ज नाकारले जातात. पालकांना हेलपाटे मारावे लागतात. हे टाळण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे.
राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना आधार कार्ड व आयुष्मान भारत कार्ड मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील हजारो दिव्यांगांना शासकीय योजनांच्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यावर (डीबीटी), जमा होईल. संजय गांधी निराधार अनुदान, वैद्यकीय उपचार आदी सुविधाही त्यांना सहजतेने मिळतील. मुख्यमंत्र्यांनी सात एप्रिलला घेतलेल्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांसाठी डीबीटीद्वारे रक्कम देण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. युआयडीएआयच्या विशेष सूट प्रक्रियेचा (बायोमेट्रिक एक्सेप्शन) अवलंब करून आयुष्मान भारत गोल्डन कार्ड प्राधान्याने काढण्यासाठी आधार केंद्रे, सीएससी केंद्रे व तालुका कार्यालयात विशेष शिबिरे आयोजित करावीत, असा आदेश जारी करण्यात आला आहे. एकही दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, असे दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
सात-आठ वर्षांची मुले-मुली, तरुणांसह अनेक दिव्यांगांकडे कुठलेही शासकीय ओळखपत्र नसते. काही जण कायम अंथरुणाला खिळून असतात. शारीरिक हालचालींअभावी त्यांच्या बोटांचे ठसे गुळगुळीत होतात. डोळ्यांची सारखी उघडझाप होत असल्याने बुबूळे स्कॅनरला जुळत नाहीत. बायोमेट्रिक पडताळणीअभावी त्यांच्या आधार कार्डसाठीच्या अर्जावर प्रक्रिया होत नाही. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ व शासन निर्णय ९ ऑक्टोबर २०२५ नुसार आता युडीआयडी कार्ड (वैश्विक दिव्यांग ओळखपत्र) व आधार कार्डचे लिंकिंग अनिवार्य करण्यात आले आहे. यातही दिव्यांगांना अडचणी येत होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतची संपूर्ण माहिती विनाविलंब आयुक्तालयास सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील लाखो दिव्यांगांना प्रत्यक्ष फायदा होऊन ते मुख्य प्रवाहात येण्यासाठी सकारात्मक पावले पडतील. यासाठी आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन सह अन्य संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
---
आम्ही फक्त पाठपुरावा केला नाही, तर दिव्यांगांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. आता आधार कार्ड मिळेल तेव्हा दिव्यांगांना खरा आनंद होईल. शासनाने आमची महत्त्वाची गरज ओळखली. ही शासनाची संवेदनशीलता दिव्यांगांना खऱ्या अर्थाने ‘आधार’ व ‘आयुष्य’ देणारी ठरणार आहे.
- विजय पगडे, अध्यक्ष, आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन
---
माझा मुलगा अमित २३ वर्षांचा आहे. त्याच्या हाताचे ठसे उठत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड मिळत नव्हते. परिणामी शासकीय सेवेचा लाभ मिळाला नाही. आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशनच्या पाठपुराव्यामुळे अशा मुलांसाठी विशेष शिबीराद्वारे हक्काचे आधारकार्ड मिळणार आहे. याआधी आम्ही आधार कार्डसाठी असंख्य हेलपाटे मारले, पण कुणी ऐकत नव्हते. आता पहिल्यांदाच आमच्या मुलांची व्यथा समजून घेण्यात आली आहे.
- प्रवीण बुनगे, पालक
---
----
दिव्यांग बांधवांची हेळसांड होऊ नये म्हणून दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील विविध भागात काही केंद्रांकडे या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा.
- महेश पाटील, आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

