आदर्श शाळा घडवणाऱ्या शिक्षकास अखेर न्याय

आदर्श शाळा घडवणाऱ्या शिक्षकास अखेर न्याय

यवत/केडगाव, ता. १० : युवराज घोगरे या शिक्षकाची कल्पना आणि गावकऱ्यांची साथ यातून दौंड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नावारूपाला आली. मात्र, गेली ६ वर्षे कमानीवरील सौजन्याच्या नावामुळे हे शिक्षक वादात अडकले. सुमारे अडीच वर्षे चौकशीचा ससेमिरा त्यांना सहन करावा लागला. अखेर जिल्हा परिषदेने त्यांना दोषमुक्त केले. याबाबतचा आदेश त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिला.
विठ्ठलवाडी (ता. दौंड) येथील काही ग्रामस्थांनी १५ मार्च २०२१ ला युवराज घोगरे या शिक्षकाविरोधात तक्रार केली. दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीच्या अहवालावरून त्यांची विभागीय चौकशी लावली आणि त्यांची प्रतिनियुक्ती पारगावच्या (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद शाळेत केली. तसेच, शासकीय सेवेत असताना राजकीय गैरफायदा घेणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सामाजिक तणाव निर्माण करणे, चौकशी समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण करणे, विनापरवानगी वर्गणी गोळा करून खर्च करणे, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियमांचा भंग करणे, असे पाच आरोप त्यांच्यावर लावले होते. मात्र, त्यांची दुसऱ्या शाळेत केलेल्या प्रतिनियुक्ती शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांनी विरोध केला. सहा महिन्यांनंतर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द केली आणि ते पुन्हा विठ्ठलवाडी शाळेत रुजू झाले.
दरम्यान, तब्बल अडीच वर्षे घोगरे यांची विभागीय चौकशी सुरू राहिल्याने त्यांना न्याय मिळावा म्हणून व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे आपले म्हणणे मांडले. अखेर विभागीय चौकशी समितीने या संपूर्ण चौकशीत घोगरे यांच्यावर केलेले पाचही आरोप सिद्ध होत नसल्याचे लेखी कळवले. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी घोगरे यांना वरील सर्व आरोपांतून दोषमुक्त करत असल्याचा आदेश पंचायत समिती दौंडमार्फत नुकताच दिला.

आरोप केलेले दुसरे गुरुजी निर्दोष
या पूर्वी दत्तात्रेय वारे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी, ता. शिरूर) आणि आता युवराज घोगरे यांच्याच्यावरील आरोपही बिनबुडाचे ठरले आहेत. मात्र, या कालावधीत हे शिक्षक किती यातनेतून जातात, याची कल्पना करवत नाही. बदनामी होते. युवराज घोगरे निर्दोष ठरले आणि पुन्हा एकदा तेच सिद्ध झाले की, या शिक्षकांचा द्वेष करण्यातून हे खोटे आरोप लावण्यात आले. युवराज घोगरे यांच्या निमित्ताने पुन्हा गुणवंत शिक्षकांचा छळ करणाऱ्या मानसिकतेचा पराभव झाला.

आरोप, चौकशी, बदली आणि सतत बदनामीला सामोरे गेल्याने मला हृदय विकाराचा त्रास झाला. माझी ॲन्जिओप्लास्टी करावी लागली. मला होत असलेला हा त्रास पाहून आईलाही ब्रेन स्ट्रोक आला. आज मी दोषमुक्त असलो तरी मला आणि माझ्या कुटुंबाला झालेल्या त्रासाला जबाबदार कोण, याचे उत्तर मिळेल काय?
- युवराज घोगरे, शिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com