
आडगाव बार्पेच्या दिशेने वाकड-हिंजवडीतील शेलेकऱ्यांचे प्रस्थान
वाकड, ता. ११ : वाकड-हिंजवडी गावचे ग्रामदैवत श्री म्हातोबा महाराजांच्या बगाड मिरवणुकीसाठीच्या बगाडाचे शेला (लाकूड) आणण्यासाठी सोमवारी (ता. ११) हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेकडो शेलेकरी बार्पेच्या (आडगाव) दिशेने रवाना झाले.
हिंजवडीतील म्हातोबा टेकडी पायथ्याशी असलेल्या शिवाजी चौकातून बार्पेच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी महिलांनी औक्षण करून शेलेकऱ्यांना निरोप दिला. पैस... पैस.. म्हातोबाच्या नावं चांगभलं, चांगभलं बोला चांगभलंच्या जय घोषाने अवघी आयटी नगरी दुमदुमली.
दोन वर्षे कोरोना संकटामुळे वाकड-हिंजवडीसह पंचक्रोशीतील भाविकांना म्हातोबा उत्सवाला मुकावे लागले होते. त्यामुळे यंदा शेलेकऱ्यांना निरोप देण्यासाठी ग्रामस्थ व भाविकांनी गर्दी केली. चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीला होणाऱ्या वाकड-हिंजवडीसह मुळशी तालुक्याचे व पुणे जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हातोबा देवाची हजारो वर्षांपासून ऐतिहासिक बगाड मिरवणूक जिल्ह्याचे आकर्षण आहे.
हनुमान जयंतीच्या म्हणजेच यात्रेच्या १० दिवस आधी देव बसतात आणि वाकड-हिंजवडी ग्रामस्थांचा उपवास सुरू होतो. या १० दिवसांत प्रत्येकाच्या घरी देवाची पूजा होत नाही. बगाडाला नैवेद्य-बोण दाखवूनच उपवास सोडला जातो. हनुमान जयंतीला दुपारी ४नंतर हिंजवडी गावाठानातून वाकडच्या दिशेने बगाड मिरवणूक निघते, मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक वाकड हिंजवडीत जमतात.
पहिला मुक्काम जमगाव दिसली येथे करून दुसरा मुक्काम आडगाव बार्पे येथे नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे लाकडाची शेले म्हणून निवड करण्यात येते. महाप्रसाद घेऊन हे शेले खांद्यावर घेऊन शेलेकरी हिंजवडीच्या दिशेने मार्गस्थ होतात रस्त्यात पुन्हा दिसली येथे मुक्काम करून हनुमान जयंतीच्या दोन दिवस आधी म्हणजेच गुरुवारी रात्री (ता. १४) तारखेला शेलेकरी हिंजवडीत दाखल होणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..