
अकलूजच्या बांधकाम व्यावसायिकाचे पिस्तूल चोरीस
पुणे, ता. २२ : लोणावळ्याला निघालेल्या सोलापूरमधील एका बांधकाम व्यावसायिकाचे परवाना असलेले पिस्तूल आणि दोन लाख रुपये कारमधून चोरीला गेले. एम. जी. रस्त्यावरील मोनाफूड हॉटेलसमोर सोमवारी (ता. २०) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी ५० वर्षीय व्यावसायिकाने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहेत. ते बांधकाम व्यावसायिक असून, त्यांच्याकडे परवाना धारक गन अॅन्ड सेल कंपनीची ३२ बोअरची पिस्तूल आहे. सोमवारी ते मुलाला लोणावळा येथे असलेल्या शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. कार घेऊन ते जात असताना पुण्यातील लष्कर परिसरात खरेदीसाठी थांबले होते. एम.जी. रोडवरील मोनाफूड हॉटेलसमोर त्यांनी कार पार्क केली होती. कार चालकाला गाडीत थांबण्यास सांगितले होते. खरेदीसाठी गेल्यानंतर त्यांनी रोख दोन लाख रुपये व पिस्तूल कारमधील बॅगेत ठेवले होते. फिर्यादी हे खरेदीसाठी गेले असता एक अनोळखी व्यक्ती कारजवळ आली व त्याने चालकाला खाली पैसे पडल्याचे सांगितले. चालक खाली उतरताच त्याने बॅग चोरून नेली. परंतु, त्याच्याही हा प्रकार लक्षात आला नाही. बंडगार्डन परिसरात आल्यानंतर त्यांना बॅग चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक डोंगळे करीत आहेत.