आयुक्तपद नको रे बाबा...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्तपद नको रे बाबा...!
आयुक्तपद नको रे बाबा...!

आयुक्तपद नको रे बाबा...!

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याला पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु या गैरव्यवहारामुळे आता परीक्षा परिषदेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्पष्टपणे नकार येऊ लागला आहे. गेल्या दहा दिवसांपासून आयुक्तपद रिक्त असल्याने परीक्षा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य विभाग, म्हाडा पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेच्या निकालात फेरफार करून उमेदवारांचे गुण वाढविल्याच्या तक्रारीवरून परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे याला १७ डिसेंबरला अटक केली. सुपे याला पोलिस कोठडीही देण्यात आलेली आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने सुपे यांना निलंबित करण्याची कार्यवाही केली. त्यानंतर हे आयुक्तपद रिक्त झाले. दरम्यान, टीईटी गैरव्यवहाराने चर्चेत आलेल्या परीक्षा परिषदेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यास शिक्षणाधिकारी नकार देत असल्याची माहिती समोर येत आहे.
या पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे द्यायचा, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला होता. सध्या परीक्षा परिषदेत हारून आत्तार आणि शैलजा दराडे हे दोन उपायुक्त कार्यरत आहेत. त्यापैकी कोणाला तरी आयुक्तपदाची सूत्रे देणे सद्यःस्थितीत सोयीचे ठरेल, असा विचार शिक्षण विभागाकडून करण्यात आला. त्यानुसार आत्तार यांच्याकडेच आयुक्तपदाची सूत्रे देण्याचे ठरविण्यात आले. परंतु आत्तार यांनी हा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यात स्पष्ट नकार दर्शविला आहे. आत्तार यांच्याकडे परीक्षा परिषदेतील उपायुक्तपदाची जबाबदारी आहे. त्याशिवाय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वीच त्यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे असे असताना आणखी एक जबाबदारी स्वीकारल्यास तिन्ही पदांची सूत्रे सांभाळणे शक्य होणार नाही, तसेच एखाद्या पदाला योग्य न्याय देता येणार नाही. त्यामुळे परीक्षा परिषदेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दुसऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांची निवड करावी, असे सुचवत आत्तार यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आता दहा दिवस उलटून गेले, तरी परीक्षा परिषदेला आयुक्त पद अद्यापही रिक्त असल्याने अनेक प्रलंबित कामे खोळंबल्याचे चित्र आहे.

राज्य परीक्षा परिषदेतील प्रलंबित विषय
- इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादीची प्रतीक्षा
- टीईटी २०२१च्या परीक्षेचा निकाल प्रलंबित
- राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) प्रशासकीय कारणास्तव ढकलली पुढे

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..