
पुणे शहरात पुन्हा निर्बंध लागू
पुणे, २५ : ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेनेही शहरात कोरोना प्रतिबंधक नियमावली लागू केली आहे. शहरात रात्री ९ ते सकाळी ६ दरम्यान जमावबंदी लागू असणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (ता. २५) यासंबंधीचे आदेश काढले. खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही हे नियम लागू असणार आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे रूग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने शुक्रवारी (ता. २४) सुधारीत नियमावली लागू केली आहे. त्याचे आदेश महापालिकेला मिळाल्यानंतर हे आदेश काढले आहेत.
समारंभ, नाट्यगृह, खुल्या आणि बंदिस्त मैदानातील कार्यक्रमासाठी उपस्थितांची संख्या निश्चीत केली आहे. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहात १०० नागरिकांची मर्यादा असेल तर खुल्या मैदानात जास्तीत जास्त २५० जण किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्केपेक्षा कमी उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमासाठीही उपस्थितीसाठी हेच बंधन असणार आहेत. हॉटेल, जीम, स्पाच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. आपत्ती निवारण कायद्यानुसार या नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..