राखसदृश पावडर पूजनप्रकरणी तपासाला दिरंगाई

राखसदृश पावडर पूजनप्रकरणी तपासाला दिरंगाई

महाड, ता. १ (बातमीदार) : रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर राखसदृश पावडर आणून पुस्तक पूजन केल्याचा धक्कादायक प्रकार डिसेंबर २०२१ महिन्यात घडला होता. याबाबत महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र याबाबत अद्याप फॉरेन्सिक अहवाल सादर केला नाही. आरोपींवर कारवाई करण्याबाबत महाड तालुका पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वैशाली बेलदरे आणि रुपाली दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

किल्ले रायगडावर ८ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथील प्रदीप बेलदरे पाटील, वैशाली बेलदरे पाटील, पूजा झोळे आणि इतर शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यास आले होते. यावेळी त्यांना शिवसमाधीजवळ काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. यामुळे याबाबत आक्षेप घेतला असता गडावर पुस्तक पूजन व राखसदृश्य पावडर, चंदन पावडर मिश्रण करून आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या पाच व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे विसर्जन करण्याचा घाट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत महाड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महाडमध्ये शासकीय विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वैशाली बेलदरे आणि रुपाली दाभाडे, पूजा झोळे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला. पोलिस आरोपींना वाचवण्यासाठी दिरंगाई करत असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत पुढील आठ दिवसांत कारवाई न झाल्यास संपूर्ण शिवप्रेमी आंदोलनात्मक भूमिका घेतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

महाड : पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वैशाली बेलदरे, रुपाली दाभाडे आणि पूजा झोळे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com