कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या
कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या

sakal_logo
By

पुणे, ता. २ : कोरोना रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढताना दिसत असली तरीही त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढलेली नाही. तसेच ऑक्सिजनची मागणी अचानक वाढल्याचे दिसत नाही. त्यामुळे पुणेकरांनो, घाबरू नका. संयम ठेवा आणि कोरोना प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करा, असा सल्ला सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी दिला.

पुण्यात गेल्या सोमवारी कोरोनाचे ८० रुग्ण आढळले होते. आठवडाभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने पाचशेचा आकडा ओलांडला. त्यावेळी अत्यवस्थ रुग्णांची संख्या ७६ होती. आता ५१४ रुग्णांचा आकडा नोंदला गेल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांची संख्या ९९ झाली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण सहापटीने वाढले असले तरीही अत्यवस्थ रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सध्या तरी दिसत नाही. तसेच, उपचारासाठी ऑक्सिजनवर ठेवलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली नाही. कोरोना वाढत असला तरीही त्यातून मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे पुणेकरांनी कोरोनामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, त्याचा संसर्ग होणार नाही याची काळजी नक्की घेतली पाहिजे, असे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी स्पष्ट केले.

शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. त्यामुळे या बाबत नेमकेपणाने सांगता येत नाही. पुढील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या त्याचबरोबर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण, अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण याची माहिती मिळेल. त्या आधारावर अत्यवस्थ रुग्णांच्या प्रमाणाबद्दल निश्चित बोलता येईल, असेही त्यांनी सांगितले.

याबद्दल सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. रवी गायकवाड म्हणाले, ‘‘लक्षणे सौम्य स्वरूपाची असतील तर ओमिक्रॉन असण्याची शक्यता जास्त आहे. कोरोना झालेल्या प्रत्येक रुग्णाचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) सध्या होत नाही. त्यामुळे कोरोना झालेल्या सर्वच रुग्णांना नेमका कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे, हे नेमकेपणाने सांगता येत नाही.

कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे, ही एक जमेची बाजू असल्याचे सांगत डॉ. वावरे म्हणाले, ‘‘शहरात कोरोनाचे शंभर रुग्ण आढळत असताना दिवसभरात एखाद्या मृत्यूची नोंद होत असे. आज ती संख्या पाचशेवर गेल्यानंतरही मृतांच्या संख्येचा आकडा वाढलेला नाही.’’

दृष्टिक्षेपात पुण्यातील कोरोना उद्रेक
रुग्णांचे संकलित झालेले नमुने : ७७८६
एका दिवसातील रुग्णसंख्या : ५२४
आतापर्यंतची रुग्णसंख्या : ५,११,१४१
अत्यवस्थ रुग्ण : ९९
ऑक्सिजनवर उपचार घेणारे रुग्ण : ७२
कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या : ४,९९,५०९
आतापर्यंत कोरोनामुळे झालेले मृत्यू : ९११८

अशी वाढली शहरातील रुग्णसंख्या
२ जानेवारी : ५२४
१ जानेवारी : ३९९
३१ डिसेंबर : ४१२
३० डिसेंबर : २९८
२९ डिसेंबर : २३२
२८ डिसेंबर : १७१
२७ डिसेंबर : ८०

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top