पुन्हा वाढली मास्कची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुन्हा वाढली मास्कची मागणी
पुन्हा वाढली मास्कची मागणी

पुन्हा वाढली मास्कची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या चार दिवसांमध्ये वेगाने वाढल्याने सर्जिकल मास्क आणि ‘एन ९५’ची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढली. मास्क, सोशल डिस्टसिंग, सॅनिटाझर आणि लसीकरण ही कोरोना प्रतिबंधाची चतुःसूत्री असल्याने याबाबत पुणेकर पुन्हा दक्षता घेत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन आकड्यापर्यंत कमी झाली होती. ती आता पुन्हा तीन आकडी नोंदवली जात आहे. त्यामुळे पुणेकर पुन्हा मास्क खरेदीकडे वळले आहेत. शहरात ३० ते ४० टक्क्यांनी मास्कची विक्री वाढल्याचे निरीक्षण औषध विक्रेत्यांनी नोंदविले.
केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्टचे (सीएपीडी) सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ‘३ प्लाय’ आणि ‘एन ९५’ या प्रकारच्या मास्कची मागणी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मास्क खरेदी होत असल्याचे दिसते.’’ मास्कच्या विक्रीचे दर ‘अन्न व औषध प्रशासन’ने (एफडीए) यापूर्वी निश्चित केले आहेत. त्याच दराने विक्री करावी, अशी सूचनाही औषध विक्रेत्यांना दिल्याचे बेलकर यांनी सांगितले.

शहरात मास्क आणि सॅनिटायझरचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे मागणी वाढली असली तरीही त्याचा पुरवठा सुरळीत होत आहे. मास्कचे दर निश्चित केल्याने त्यापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास औषध दुकानांवर कारवाई करण्यात येईल. नुकतीच पुणे शहरात मास्कच्या विक्रीबाबत तपासणी मोहीम राबविली. त्यात कोणताही औषध विक्रेता निश्चित दरापेक्षा जास्त किमतीला मास्कची विक्री करत नसल्याचे दिसून आले असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दिनेश खिंवसरा यांनी स्पष्ट केले.

‘‘यापूर्वी कापडी मास्क वापरायचो. पण, आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने कापडी मास्क सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे एकाच वेळी दोन सर्जिकल मास्क लावणे पसंत करतो. किंवा ‘एन ९५’चा मास्क वापरतो.’’
गोपाळ कदम, ग्राहक

‘‘पल्स ऑक्सिमिटर, नेब्युलाझर, डिजिटल थर्मामिटर, क्लुकोमिटर, बीपी मॉनिटर अशा वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेबाबत बाजारपेठेत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचा मुबलक साठा शहरात उपलब्ध आहे.’’
- दिनेश खिंवसरा, सहायक आयुक्त, एफडीए

मास्कच्या किमती (आकडे रुपयांमध्ये)
३ प्लाय मास्क - ४.२०
एन ९५ मास्क - १२.६०

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top