‘डेटा सायन्स’ला विद्यार्थ्यांची पसंती

‘डेटा सायन्स’ला विद्यार्थ्यांची पसंती

पुणे, ता. ३ : अभियांत्रिकीमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असली, तरीही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान (आयटी) यांसह आता डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स) या विद्याशाखांमध्ये पदवी घेतल्यास नोकरीची हमी आणि सर्वोच्च पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असल्याने विद्यार्थ्यांकडून याच विद्याशाखांमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला पसंती मिळत आहे.

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात विद्यार्थ्यांकडून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विद्याशाखांबरोबरच डेटा सायन्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग या विद्याशाखांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल असल्याचे निदर्शनास येते. जगभरात डेटा सायन्समधील नोकऱ्यांमध्ये २०२६ पर्यंत तब्बल २७ टक्क्यांपेक्षा अधिक टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. तसेच, गेल्या काही वर्षांपासून डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कलदेखील याच क्षेत्राकडे झुकत असल्याचे निरीक्षण नोंदविले जात आहे.

‘‘संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, ॲप्लिकेशन या क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा कल या विद्याशाखांकडे वाढत आहे. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम करावा तसेच, एखादे स्टार्टअप सुरू करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या विद्याशाखा अभ्यासक्रमासाठी निवडत असल्याचे दिसून येते. त्याशिवाय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमात या विद्याशाखांची तोंड ओळख करून दिली आहे. त्यामुळे देखील विद्यार्थ्यांकडून या विद्याशाखांमध्ये करिअर करण्याला विशेष पसंती दिली जात आहे.’’
- डॉ. कल्याणी जोशी, प्राचार्य, पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

‘‘जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या (इंडस्ट्री ४.०) उंबरठ्यावर असताना आगामी काळात ऑटोमेशन क्षेत्राला विशेष महत्त्व असणार आहे. ऑटोमेशनच्या काळात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात संधी असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात कॉम्प्युटर, आयटी यानंतर डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेला प्राधान्य देत आहेत. आगामी काळात मोठी मागणी असेल, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध होतील, अशा दृष्टिकोनातून विद्यार्थी या विद्याशाखांना पसंती देत आहेत.’’
- डॉ. आर. के. जैन, संचालक, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

अभियांत्रिकी अभ्यासक्रम निवडीचा प्राधान्यक्रम :
१. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
२. माहिती तंत्रज्ञान (आयटी)
३. डेटा सायन्स
४. कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स)
५. मशिन लर्निंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com