महत्त्वाची मेसेज अन् डिलिट मेसेजचे महत्त्व! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महत्त्वाची मेसेज अन्
डिलिट मेसेजचे महत्त्व!
महत्त्वाची मेसेज अन् डिलिट मेसेजचे महत्त्व!

महत्त्वाची मेसेज अन् डिलिट मेसेजचे महत्त्व!

sakal_logo
By

प्रणालीचा व्हॉटसअपवरील ‘डिलीट’ मेसेज पाहिल्यानंतर योगिराज चिंताग्रस्त झाला. तिने कोणता मेसेज डिलीट केला असेल, याची त्याला काळजी वाटू लागली. ३१ डिसेंबरच्या रात्री आपण नको ती माहिती तिला दिली नाही ना? हे तो आठवू लागला. पार्टीतील डान्सचा व्हिडिओ तर तिने पाहिला नसेल? शेजारच्या मानसीवहिनींना आपण सकाळी ‘हाय’ केलं, हे तर तिनं पाहिलं नसेल ना? अशा अनेक शंका त्याच्या मनात आल्या. तासभर तो डोक्याला हात लावून बसला. शेवटी सगळं मनोधैर्य गोळा करून, त्याने ‘सॉरी’चा मेसेज टाकला. ‘परत असं करणार नाही,’ याचीही त्याने ग्वाही दिली व शेवटी ‘तू कोणता मेसेज डिलीट केलास’, असं त्याने घाबरतच विचारलं.
‘‘अहो, दोन दिवसांनी तुमचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला साडी आणि तुम्हाला भारीतले हातरूमाल व सॉक्स घ्यायचे आहेत. त्यासाठी पाच हजार रुपये हवे आहेत.’’ हा मेसेज तिने पुन्हा पाठवला. हा मेसेज वाचताच योगिराजच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला.
‘आता मेसेज डिलीट केला तरी चालेल,’’ असा मेसेज त्याने प्रणालीला पाठवला. त्यावर तिने फोन करून पाच हजार रुपयांचा हट्टच धरला.
‘‘अगं माझ्याकडे आता पाच हजार रुपये नाहीत. बॅंकेतून मला ते आणावे लागतील.’’ योगिराजने म्हटलं. त्यावर पैसे आणून द्या, असा हट्टच प्रणालीने धरल्यावर त्याचाही नाइलाज झाला. बॅंकेत जायचंय, या विचारानेच त्याच्या अंगावर काटा आला. बॅंकेत कितीवेळ लागेल, याची शाश्‍वती नसल्याने त्याने आधी पोटपूजा केली.
बॅंकेत पोचल्यावर पैसे काढण्याच्या रांगेत तो उभा राहिला. दोन तासानंतर त्याचा नंबर आला. तेवढ्यात कॅशियरने खिडकी बंद करून, ‘क्लोज्ड’चा बोर्ड लावला.
‘‘अहो, दोन मिनिटांनी तो बोर्ड लावा की. माझाच नंबर आल्यावर बरं सुचलं तुम्हाला.’’ योगिराजनं बडबड केली. पण ग्राहकांच्या बोलण्याकडं लक्ष द्यायचं नसतं, याचं प्रशिक्षणच कर्मचाऱ्यांना दिलं जात असावं. त्यामुळं काहीही न बोलता तो कर्मचारी तेथून निघून गेला. तासाभराने स्वारी डुलत -डुलत जाग्यावर आली.
मघाचाच राग योगिराजच्या मनात खदखदत होता.
‘‘झालं का जेवण’’? त्याने कुत्सितपणे विचारले.
‘‘तुम्हाला काय करायच्यात नुसत्या चौकशा? कामाचं बोला.’’ कॅशियरने नजर रोखून विचारलं.
‘‘पाच हजार रुपये पाहिजेत.’’ योगिराजने स्लीप देत म्हटले.
‘‘पैसे नाहीत.’’ कॅशिअरने नकारार्थी मान हलवत उत्तर दिले.
‘‘क्काऽऽय? पैसे नाहीत? मी दोन तास रांगेत उभा आहे. माझा नंबर आल्यानंतर तुम्ही हे मला सांगताय? मी काय रिकामटेकडा वाटलो का तुम्हाला? आमच्यासारखी लोकं सहनशील आहेत म्हणून तुमचं फावतंय.’’ योगिराजने आवाज चढवत विचारलं.
‘‘अहो ऐकून तरी घ्या.’’ कॅशियरने म्हटले.
‘‘काय ऐकून घ्यायचं? विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारखी माणसे बॅंकांना नऊ- दहा हजार कोटी रुपयांचा चुना लावतात. त्यांच्यासारख्या फसव्या माणसांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे असतात आणि आमच्यासारख्या माणसांना पैसे द्यायच्यावेळी तुम्ही हात वर करता. खुशाल पैसे नाहीत, असे सांगता ! मी आजच अर्थमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत जाब विचारणार आहे.’’ योगिराजचा स्वर आता चांगलाच तापला होता. आता रांगेतील इतर नागरिकांनीही ‘बरोबर आहे’चा सूर मिसळला होता.
‘‘अहो, बॅंकेकडे भरपूर पैसे आहेत. तुमच्या खात्यावर पैसे नाहीत. त्यामुळं मी ‘पैसे नाहीत,’ असं म्हटलं.’’
कॅशियरचं बोलणं ऐकून योगिराजचा चेहरा पाहण्यासारखा झाला. ‘‘अच्छा! दोन लाखांचा चेक क्लिअर झाला नाही वाटतं.’’ कॅशिअर व इतर ग्राहकांची नजर चुकवत तो खालच्या आवाजात पुटपुटला व बाहेर आल्यानंतर त्याने प्रणालीला ‘बॅंकेत पैसे नाहीत, त्यामुळे पैसे आल्यावर परत कधीतरी वाढदिवस साजरा करू,’ असा व्हॉटसॲप मेसेज केला व लगेच तो डिलीटही केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top