दोन्ही डोस घेऊन ७५ टक्के नागरिकांना लागण

महापौर मुरलीधर मोहोळ यांची आयोजित पत्रकार परिषदेत माहिती

दोन्ही डोस घेऊन ७५ टक्के नागरिकांना लागण महापौर मुरलीधर मोहोळ यांची आयोजित पत्रकार परिषदेत माहिती

पुणे, ता. ३ ः ‘‘गेल्या आठवड्याभरापासून शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना, त्यामधील ७५ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. रुग्ण संख्या वाढत असली तरीही नवे निर्बंध न आणता हे सध्याचे नियम आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे,’’ अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाढत्या रुग्ण संख्येचा आणि महापालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज (ता. ३) महापालिकेत बैठक घेतली. यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह सर्व पक्षाचे गटनेते, अधिकारी उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६०० पर्यंत खाली आली होती. पण, आज ती अडीच हजारापर्यंत गेली आहे. शहरात सध्या ४७ ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. अडीच हजारांपैकी ३०० रुग्ण हे विविध रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी १९० जणांना कोणताही त्रास नाही, ८० जणांना आॅक्सिजनची गरज आहे, तर २५ रुग्ण गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यामध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांकडून व आस्थापनांकडून नियमांचे पालन केले जात नाही, मॉलमध्ये दोन्ही डोस झालेल्यांचा प्रवेश आहे, हॉटेल, सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणे अपेक्षीत आहे. या निर्बंधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच नियमांची कडक अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेकडे पुरेसा औषधसाठा
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी महापालिकेकडे पुरेसा औषधसाठा आहे. चार हजार रेमडेसिव्हर उपलब्ध आहेत. आयसीयू, व्हेंटिलेटर यासह सर्वप्रकारचे सुमारे एक हजार ८०० बेड आहेत. तर १२ आॅक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. त्यातून प्रति मिनीट नऊ हजार किलो आॅक्सिजन निर्मिती होते, तर १२० टन आॅक्सिजनचा साठा होऊ शकतो, एवढी क्षमता आहे. गरज भासल्यास सात दिवसात शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालय सुरू होऊ शकते. त्याचे फायर, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल आॅडिट झाले आहे. लहान मुलांसाठी येरवडा, वारजे आणि हडपसर येथे रुग्णालयाची व्यवस्था आहे, असे महापौरांनी सांगितले.

दोन्ही डोस घेतलेले बाधित नागरिक
तारीख - एकूण रुग्ण - दोन्ही डोस घेऊनही बाधीत
१ जानेवारी - ३९९ - २५०
३१ डिसेंबर - ४१२ -२९२
३० डिसेंबर - २९८ -२३८
२९ डिसेंबर - २३२ - १७५
२८ डिसेंबर - १७१ - १३०
२७ डिसेंबर - ८० - ६९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com