
परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याकडे कल
पुणे - कौटुंबिक वादातून भांडण करीत आयुष्य जगण्यापेक्षा कायमचे विभक्त होवू. त्यासाठी एकत्र बसून शांतपणे चर्चा करू, एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊ आणि आपले मार्ग मोकळे करू, अशी मानसिकता घटस्फोट (Divorse) घेत असलेल्या जोडप्यांमध्ये (Couple) वाढत आहे. त्यामुळेच संमतीने घटस्फोट घेण्याचे दररोज सरासरी पाच दावे येथील कौटुंबिक न्यायालयात (Family Court) दाखल होत आहेत.
परस्पर संमतीने घटस्फोट मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षांत तीन हजार ९८१ दावे न्यायालयात दाखल झाले. त्यापैकी तब्बल दोन हजार अर्ज हे गेल्या वर्षभरात दाखल झाले आहेत. हा आकडा पाहता गेल्या वर्षी दररोज पाच घटस्फोटाचे दावे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले आहेत. २०१९ मध्ये परस्पर संमतीने घटस्फोटासाठी १ हजार ३०० दावे दाखल झाले होते. तर २०२० मध्ये परस्पर संमतीने घटस्फोटासाठी ६७६ दावे दाखल झाले. गेल्या वर्षी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावे दाखल होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा: पुणेकरांची मिळकतकर माफी २०१८ पासून प्रलंबित
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा समावेश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायिक क्षेत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांतील वैवाहिक स्वरूपाचे दावे कौटुंबिक न्यायालयाकडे दाखल होऊ लागले आहेत.
परस्पर संमतीने १६८८ घटस्फोट
कौटुंबिक न्यायालयात गेल्या वर्षभरात पोटगी, मुलांचा ताबा, घटस्फोट आदी प्रकारचे ३ हजार ७९७ दावे दाखल झाले, तर ३ हजार ७३१ दावे निकाली काढण्यात आले. त्यापैकी १६८८ घटस्फोटाचे दावे परस्पर संमतीने निकाली काढण्यात आले. घटस्फोटाचा दावा दाखल झाल्यावर न्यायालयाकडून समुपदेशन, मध्यस्थीच्या माध्यमातून अर्जदार पती-पत्नीला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो.
वर्ष- दाखल दावे - निकाली दावे- परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावे- संमतीने घटस्फोट
२०१९- ३८७४ - ४४४५ - १३०० - १७४२
२०२० - २३३२ - २१८७ - ६७६ - १०५३
२०२१ - ३७३१- २००५ -२००५ - १६८८
एकूण - ९९३७- ८६३७- ३९८१- ४४८३
हेही वाचा: पुणे : वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
कोरोनानंतर संमतीने दावे दाखल करण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. दावा दाखल करण्यापूर्वी आम्ही दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. पण एकत्र येणे शक्य नसेल तर त्यांना संमतीने विभक्त होण्याचा सल्ला देतो. शारीरिक व मानसिक त्रास, वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी जोडपी दोघांच्या मर्जीने घटस्फोटाचा अर्ज दाखल करीत आहेत.
- वैशाली चांदणे, कौटुंबिक न्यायालयातील वकील
संमतीने घटस्फोटाची कारणे
- प्रक्रिया लवकर होते
- एकमेकांची बदनामी होत नाही
- मुलांना जास्त त्रास सोसावा लागत नाही
- शारीरिक व मानसिक त्रास कमी
- मर्जीने अर्ज केल्याने द्वेष भावना नाही
- वेळ व पैसा वाचतो
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..