पुण्याच्या फार्मपार्सल स्टार्टअपचा गौरव | Farmparcel Startup | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farm Parcel
पुण्याच्या फार्मपार्सल स्टार्टअपचा गौरव

पुण्याच्या फार्मपार्सल स्टार्टअपचा गौरव

पुणे - एकीकडे वडिलोपार्जित शेतीत पिकलेल्या मालाला (Agriculture Goods) योग्य भाव मिळत नाही, तर दुसरीकडे ग्राहकांपर्यंत (Customer) पोचलेल्या मालाचा दर्जा खालावलेला असतो. यावर उपाय म्हणून जुन्नर तालुक्यातील निरगुडे गावातील प्रथमेश निरगुडकर यांनी मित्रांच्या सहकार्याने पाच वर्षांपूर्वी फार्मपार्सल स्टार्टअप (Farmparcel Startup) सुरू केले. शेतकरी ते थेट रस्त्यावरील विक्रेते व ग्राहकांपर्यंत कृषी उत्पादन पोचविणाऱ्या या स्टार्टअपने जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग (नियाम)कडून उत्कृष्ट कृषी स्टार्टअप म्हणून इन्क्युबेशनही पूर्ण करून आर्थिक अनुदानही प्राप्त केले आहे.

कृषिमालाची थेट घरापर्यंत विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या असतानाही निरगुडकर यांनी पाच वर्षांत पारंपरिक विक्रेत्यांच्या मदतीने आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भक्कम विक्री साखळी निर्माण केली आहे. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या निरगुडकर यांच्याबरोबर शंतनू लामधडे, नीलेश बामणे, अनुप बुधले सहभागी झाले आहेत. याबाबत निरगुडकर सांगतात, ‘‘शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर आणि ग्राहकाला दर्जेदार उत्पादने मिळावी म्हणून आम्ही हे स्टार्टअप सुरू केले. यामध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विक्रेत्याचा स्तर उंचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. केवळ ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन पद्धतीनेही कृषिमालाची विक्री करण्यात येते.’’ कृषी पर्यटनाबरोबरच बचत गटांनाही प्रोत्साहन देण्याचे काम या स्टार्टअपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

हेही वाचा: पुणे शहरात कोरोना रुग्णांत ३० दिवसांत दहा पटीने वाढ

असा आहे स्टार्टअप

 • जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तोडलेला माल २४ तासांच्या आत ग्राहकांपर्यंत

 • https://www.farmparcel.in/ या संकेतस्थळाबरोबरच व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही मालाची विक्री

 • स्थानिक विक्रेत्यांना थेट शेतातून आलेला माल पुरविण्यात येतो

 • ग्राहकाला ऑनलाइन नोंदणीतून कृषी उत्पादनांचा पुरवठा

शेतकऱ्याला होणारा फायदा

 • आधारभूत किमतीत थेट शेतातून मालाची खरेदी

 • बाजारात घेऊन जाणे, पॅकेजिंग, वाहतूक, आडत आदी खर्च वाचतो

 • फार्म कॉटेजसारख्या कृषी पर्यटनासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन

 • बचतगटांची उत्पादनेही स्टार्टअपच्या माध्यमातून विकली जातात

स्थानिक विक्रेत्यांना होणारा फायदा

 • जागच्याजागी ताजा कृषिमाल मिळतो

 • स्टार्टअपच्या संकेतस्थळावर नोंदणी करणारे ग्राहक मिळतात

 • कृषीमालाबरोबरच ग्रोसरी, बचत गटांची उत्पादने, मांसाहारी उत्पादने विक्रीची संधी

 • रेडी टू कुक आणि रेडी टू इट उत्पादनही विकता येतात

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Startuppune
loading image
go to top