पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीचा पुढील आठवड्यामध्ये निकाल

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीचा पुढील आठवड्यामध्ये निकाल

पुणे, ता. ६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल व्हायरल झाल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला होता. त्यानंतर अधिकृत निकाल जाहीर केला नसल्याचे स्पष्टीकरण परीक्षा परिषदेने दिले आहे. दरम्यान, या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्य परीक्षा परिषदेने १२ ऑगस्ट २०२१ मध्ये पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली. त्यासाठी राज्यातील ४७ हजार ६१६ शाळांमधून पाचवीच्या तीन लाख ८८ हजार ४०५, तर आठवीच्या दोन लाख ४४ हजार २६२ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. मुंबई वगळता राज्यातील पाच हजार ६८७ केंद्रांवर ही परीक्षा झाली. आता ही परीक्षा होऊन पाच महिने उलटले, तरीही अधिकृत निकाल जाहीर झाला नसल्याने शिक्षकांसह विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादी सोशल मीडियावर फिरत असल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित लिंक बंद केली. या प्रकारामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाबाबत मागील आठवडाभर उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावर ‘इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२१’चा अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही,’ असे स्पष्टीकरण परिषदेने अधिकृत संकेतस्थळावर दिले आहे.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०२१च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही. पाचवी आणि आठवीच्या २०२१ मध्ये घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे काम पूर्ण होत आले आहे. हा निकाल पुढील आठवड्यात जाहीर करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- दत्तात्रेय जगताप,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com