
पांडुरंगाची आळवणी ते विचारांची पेरणी
पुणे, ता. २४ ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाची आळवणी; महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणाऱ्या उद्योजकांसह शैक्षणिक, वैद्यकीय, बँकिंग, कृषी, सेवा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा झालेला सन्मान; महाब्रॅंड काॅफी टेबल बुकचे शानदार प्रकाशन आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या एकमेकांशी झालेल्या गप्पा.... अशा वातावरणात ‘सकाळ माध्यम समूहा’चा ‘ब्रॅंड ऑफ महाराष्ट्र’ अर्थात ‘महाराष्ट्राचा महाब्रॅंड’ पुरस्कार वितरण सोहळा रविवारी रंगला. त्याला माजी मुख्यमंत्र्यांच्या कोपरखळ्या आणि शब्दफुलांची जोड मिळाली. महाराष्ट्राच्या विकासाबाबत विचारांची पेरणीही झाली.
महाराष्ट्राच्या स्थापनेला ६१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ''सकाळ माध्यम समूहा''तर्फे राज्यातील विविध क्षेत्रांतील अग्रेसर संस्थांना ‘महाब्रॅंड’ पुरस्कार देऊन रविवारी बालेवाडी-महाळुंगे येथील सभागृहात गौरविण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ''महाब्रॅंड'' पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधत विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित होते. तत्पूर्वी, मंगलमय सुरांच्या साथीने अल्हाददायक झालेल्या वातावरणात राज्यभरातून आलेले उद्योजक, व्यावसायिक, सेवा क्षेत्रातील अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधींचे स्वागत झाले. ‘सकाळ’चे संचालक-संपादक श्रीराम पवार यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करत पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. सर्व प्रथम सुशीलकुमार शिंदे यांचे सभागृहात आगमन झाले. त्यांच्या हस्ते काही पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर मनोहर जोशी यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा देऊन त्यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर शरद पवार यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. त्यानंतर फडणवीस आले. त्यांच्या हस्ते काही पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले.
''पुरस्कार वितरण आधी शिंदे साहेबांच्या हस्ते झाले. त्यानंतर पवार साहेबांच्या हस्ते काही पुरस्कार दिले. नंतर माझ्या हस्ते दिले. पुन्हा शिंदे साहेब व पवार साहेब असे चक्र सुरू होते. असेच राजकारणातही असते. एकाची सत्ता गेली की दुसऱ्याची येते. पुन्हा पहिल्याची येते'', अशी कोपरखळी फडणवीस यांनी केल्यानंतर हास्याचे फवारे उडाले. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत असल्यामुळे मी आपली रजा घेत आहे,'' असे सांगून फडणवीस हे पवार व शिंदे यांना नमस्कार करून मार्गस्थ झाले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आले. त्यांनीही शुभेच्छा देत पुरस्कारांर्थींचे कौतुक करत महाराष्ट्राच्या वाटचालीचा आढावा घेतला.
काही वेळाने नारायण राणे आले. त्यानंतर ‘महाब्रॅंड काॅफी टेबल बुक’चे प्रकाशन झाले. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा राणे यांनी घेतला. त्यानंतर पुन्हा काही ब्रॅंडचा सन्मान केला. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संयुक्त महाराष्ट्र काळापासून आजपर्यंत झालेल्या महाराष्ट्राच्या प्रगतीचा व विकासाचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर व्यासपीठावरून खाली आलेल्या माजी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत अनेकांनी फोटो सेशन केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..