थकबाकी भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकी भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत
थकबाकी भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत

थकबाकी भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत

sakal_logo
By

पुणे, ता. १० : कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थकीत रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत मिळविण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. आतापर्यंत या योजनेत पश्चिम महाराष्ट्रातील सहा लाख ४५ हजार ८१२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी एक लाख ९४ हजार ३८१ शेतकऱ्यांनी संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे.

दरम्यान, थकबाकीमुक्तीसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून गावोगावी जनजागृतीपर शेतकरी मेळावे व संवाद मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना वीजबिलाबाबत तक्रार किंवा शंका असेल, त्याचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ व सहभाग घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नाळे यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत कृषिपंपाच्या ३५ हजार ६१९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. तर चालू व थकीत वीजबिल भरण्यातून ग्रामपंचायती व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी ३३ टक्के असा एकूण ७५५ कोटी ८८ लाख रुपयांचा आकस्मिक निधी जमा झाला आहे. या निधीमधील वीज यंत्रणेच्या स्थानिक कामांसाठी आतापर्यंत २०२ कोटी ६७ लाख रुपये खर्चाचे पाच हजार ७५७ कामांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहेत.
पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सहा लाख ४५ हजार ८१२ शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीचे एकूण ९२९ कोटी ५४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना १६७१ कोटी ३० लाख रुपयांची मूळ थकबाकीमध्ये सूट मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ६१ हजार ८२६ तर सातारा जिल्हा- ६० हजार ८२९, पुणे जिल्हा- ३३ हजार ८८८, सांगली जिल्हा- २७ हजार ७५०, आणि सोलापूर जिल्ह्यातील १० हजार ८८ शेतकरी वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झाले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top