शहरातील घरफोड्या काही थांबेनात!

शहरातील घरफोड्या काही थांबेनात!

पुणे, ता. १० ः शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोड्यांच्या घटना थांबत नसल्याची सद्यःस्थिती आहे. चतुःश्रृंगी, कोंढवा व सिंहगड रस्ता परिसरामध्ये झालेल्या घरफोड्यांच्या घटनांमध्ये तब्बल नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात घरफोडी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीधील भांबुर्डा येथील शरद सहकारी पुनर्वसन संस्था या इमारतीमध्ये राहणाऱ्या ७१ वर्षीय नागरिकाच्या घरी चोरीच्या घटना घडली आहे. याप्रकरणी त्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सात जानेवारीला घराबाहेर पडले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटामध्ये ठेवलेली ६३ हजार रुपयांची रोख रक्कम, सात लाख ९१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे असा साडे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता परत आले. त्यावेळी त्यांना त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एल. एस. उकीरडे करीत आहेत.
महंमदवाडी येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी रोनाल्ड पास्कल डिमेला (वय ३२) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महंमद वाडी येथील इडन गार्डन सोसायटीत राहतात. ८ जानेवारीला ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. फिर्यादी परत आल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातही घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुनील नामदेव कराळे (रा. आनंद विहार कॉलनी, हिंगणे खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आनंद विहार कॉलनीमध्ये राहतात. ८ जानेवारीला ते बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील दहा हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली.

गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ
हडपसर परिसरात दोन महिन्यांपूर्वी एकाच रात्री घरफोडीच्या काही घटना घडल्या. याप्रकरणी नागरिक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी जात होते, मात्र पोलिसांकडून नागरिकांची दखल घेतली नाही. त्यांना काही दिवस हेलपाटे मारण्यास लावल्यानंतर, नागरीकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तक्रार घेतली. चोरी, घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, तसे होत नाही. चोरी झाल्यानंतरही पोलिस दखल घेत नसल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com