‘एम.टेक’कडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
राज्यात अभ्यासक्रमाच्या ६९ टक्के जागा रिक्त; नोकरीच्या संधींची कमतरता जाणवत असल्याचा परिणाम

‘एम.टेक’कडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ राज्यात अभ्यासक्रमाच्या ६९ टक्के जागा रिक्त; नोकरीच्या संधींची कमतरता जाणवत असल्याचा परिणाम

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ : राज्यातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला (एम. ई. आणि एम. टेक ) विद्यार्थ्यांकडून यंदा फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासक्रमाच्या ६९.४१ टक्के जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षणात कॉम्प्युटर सायन्स वगळता अन्य विद्याशाखांमधील जागा बहुतांश करून रिक्त राहत आहेत.

बी.ई आणि बी.टेक पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगली नोकरी मिळविण्याची स्पर्धा होत असताना या पदवी अभ्यासक्रमाच्या ३६.६३ टक्के आहेत. तसेच या क्षेत्रात ‘स्पेशलायझेन’ मिळविण्यास उपयुक्त असलेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागाही रिक्त आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आतापर्यंत झालेल्या प्रवेशाची यादी नुकतीच जाहीर केली. त्यानुसार अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी (२०२१-२२) राज्यातील १९४ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी १३ हजार ९५ जागा उपलब्ध होत्या. त्यातील सुमारे चार हजार सहा जागांवर प्रवेश निश्चित झाले असून अद्याप तब्बल नऊ हजार ८९ जागा रिक्त आहेत.

*प्रवेश कमी होण्याची कारणे
१. बी.ई./बी.टेक या पदवी शिक्षणानंतर चांगल्या नोकऱ्या उपलब्ध
२. पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘एमबीए’सारख्या अभ्यासक्रमांची निवड
३. कंपन्यांकडून कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमांसह ‘एमबीए’साठी अनेक विद्यापीठांशी सामंजस्य करार
४. पदव्युत्तर शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नसणे
५. बहुतांश कंपन्यांमध्ये ‘एम.टेक’सारखे स्पेशलायझेशन केलेल्यांना जागा उपलब्ध नसणे

*‘बी.ई/बी.टेक’च्या ५१ हजार जागा रिक्त
राज्यात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशात यंदा ३६.६३ टक्के म्हणजेच ५१ हजार ९२ जागा, तर थेट अभियांत्रिकी अभ्यासक्रम द्वितीय वर्ष प्रवेशाच्या २२.९८ टक्के म्हणजेच जवळपास १७ हजार ९०४ जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत. यंदा बी.ई./बी.टेक अभ्यासक्रमासाठी एक लाख ३९ हजार ४८४ जागा उपलब्ध होत्या. त्यातील ८८ हजार ३९२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून सुमारे ५१ हजार ९२ जागा, रिक्त आहेत. गेल्या वर्षीच्या प्रवेशासाठी एक लाख ४० हजार १३२ जागा होत्या, तर यंदा या जागा ६४८ने कमी झाल्या आहेत.

*‘अभियांत्रिकी’च्या प्रवेशाचा यंदाचा आढावा
अभ्यासक्रम : प्रवेश क्षमता : झालेले प्रवेश : रिक्त जागा : रिक्त जागांची टक्केवारी
बी.ई./बी.टेक : १,३९,४८४ : ८८,३९२ : ५१,०९२ : ३६.६३
एम.ई/एम.टेक : १३,०९५ : ४,००६ : ९,०८९ : ६९.४१
डीएसई : ७७,९१६ : ६०,०१२ : १७,९०४ : २२.९८


*‘एम.ई./एम.टेक’च्या प्रवेशाची आकडेवारी
वर्ष : प्रवेश क्षमता : झालेले प्रवेश : रिक्त जागा : रिक्त जागांची टक्केवारी
२०२०-२१ : १३,५२२ : ५,७९५ : ७,७२७ : ५७.१४
२०२१-२२ : १३,०९५ : ४,००६ : ९,०८९ : ६९.४१

राज्यात ‘एम.ई/एम.टेक’ची पदवी देणाऱ्या शिक्षण संस्था आहेत. परंतु, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), बिट्‌स पिलानी यासारख्या नामांकित संस्थांमध्ये असलेल्या ‘एम.टेक’ अभ्यासक्रम आणि राज्यातील महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमात तफावत आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील या अभ्यासक्रमाचा दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे ‘एम.टेक’ करूनही विद्यार्थ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे वास्तव आहे.
- श्रीराम गीत, करिअर समुपदेशक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com