राज्य नाट्य स्पर्धेला पुन्हा ‘ब्रेक’

राज्य नाट्य स्पर्धेला पुन्हा ‘ब्रेक’

पुणे, ता. १३ ः कोरोना विषाणू आणि त्याच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने येत्या १५ जानेवारीपासून सुरू होणारी ६० वी राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने बुधवारी सांगितले. खबरदारी म्हणून हा निर्णय झाला असला तरी स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी हा निर्णय आल्याने कलाकारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने राज्य सरकारतर्फे हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, बाल व दिव्यांग बाल राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे ही स्पर्धा रद्द झाली होती. यंदा १५ जानेवारीपासून स्पर्धा घेण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांचा तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेचा विचार सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केला. तसेच काही संघांनी या परिस्थितीत राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलावी, अशी विनंतीही केली होती. हे लक्षात घेऊन स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, असे सरकारतर्फे स्पष्ट केले.

कलाकारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
या निर्णयावर कलाकारांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. १५ जानेवारीपासून स्पर्धा सुरू होणार असल्याने जवळपास सगळ्याच संघांची तयारी पूर्णत्वाला आली होती. ऐनवेळी स्पर्धा पुढे गेल्याने नाऊमेद झाले असल्याची भावना काही कलाकारांनी व्यक्त केली. मात्र, दुसरीकडे काही संघांमधील कलाकारांनाच कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत नाटकाचा प्रयोग करणे शक्यच नव्हते. त्यामुळे या संघांनीच ईमेल व दूरध्वनीद्वारे स्पर्धा रद्द करण्याची मागणी सरकारला केली होती. या मागणीचा विचार करून स्पर्धा पुढे ढकलल्याने समाधान व्यक्त केले. याबाबत लेखक-दिग्दर्शक संतोष माकुडे म्हणाले, ‘‘कोरोनाचा धोका लक्षात घेता सरकारने हा घेतलेला निर्णय योग्य आहे, असे वाटते. भीतीच्या सावटाखाली प्रयोग करणे कोणालाच शक्य झाले नसते. मात्र, सरकार एरवी या क्षेत्राच्या बाबतीत उदासीन असते. सगळे बंद झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यास वेळ लागतो. तसे झाल्यास स्पर्धा खूप काळ लांबेल. ते टाळण्यासाठी ही परिस्थिती निवळल्यानंतर लवकरात लवकर स्पर्धेचे आयोजन व्हावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com