कौटुंबिक न्यायालयाच्या उपक्रमाने ६६ महिला झाल्या स्वयंसिद्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौटुंबिक न्यायालयाच्या उपक्रमाने
६६ महिला झाल्या स्वयंसिद्धा
प्रीतिश देशमुख, हरकळ येरवडा कारागृहात

कौटुंबिक न्यायालयाच्या उपक्रमाने ६६ महिला झाल्या स्वयंसिद्धा

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : आर्थिक स्थिती जेमतेम त्यात कौटुंबिक वाद, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात सुरू करण्यात आलेला स्वयंसिद्धा उपक्रम अनेकांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. या उपक्रमांतर्गत गेल्या पाच वर्षांत ६६ महिलांनी विविध कौशल्यविकास अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यातून स्वतःच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याइतपत पैसे त्या कमावत आहेत.

कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल असलेल्या आर्थिक निराधार महिलांना सक्षम करण्यासाठी स्वयंसिद्धा उपक्रम विवाह समुपदेशकांच्या मदतीने राबवला जात आहे. केवळ दावा सुरू असलेल्या महिलांना विविध प्रकारचे कौशल्य या अंतर्गत विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत दिले जाते. या प्रशिक्षणाच्या आधारे काही महिला खासगी क्षेत्रात नोकरी करत असून, अनेक महिलांनी टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लरसारखे व्यवसाय सुरू केले आहेत.

कौटुंबिक न्यायालयातील न्यायप्रविष्ट प्रकरणात, पतीच्या आर्थिक परिस्थितीनुसार ज्यांना पोटगी कमी मिळाली आहे, ज्यांचे पती वेळेवर पोटगीची रक्कम भरत नाहीत, अशा महिलांना मुलांचे संगोपन करत संसार चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अशा महिलांसाठी २०१७ पासून स्वयंसिद्धा उपक्रम सुरू केला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे व न्यायाधीश मनीषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह समुपदेशक राणी दाते व डॉ. सुरेश सूर्यवंशी या उपक्रमाचे कामकाज पाहतात.

या संस्था देतात प्रशिक्षण :
-रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन
-रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो
- रेणुका स्वरूप करिअर इन्स्टिट्यूट
-आयसीआयसीआय ॲकॅडमी फॉर स्कील डेव्हलपमेंट
- टाटा स्ट्राइव्ह कौशल्य विकास केंद्र
- लाइट हाउस व्यवसाय प्रशिक्षण संस्था

कार्यालय व्यवस्थापन, फॅशन डिझायनिंग, टेलरिंग, ब्युटी पार्लर, फ्लॉवर मेकिंग, नर्सिंग, बालवाडी प्रशिक्षक आदी विविध प्रकारच्या कौशल्यविकास अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. गरजू महिलांचे वय आणि शिक्षणानुसार अभ्यासक्रम निवडून संबंधित स्वयंसेवी संस्थेकडे प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. प्रवास खर्च परवडत नाही, अशा महिलांना स्वयंसेवी संस्थांमार्फत बसचा पासही काढून दिला जातो.
- डॉ. सुरेश सूर्यवंशी, विवाह समुपदेशक

स्वयंसिद्धाद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांची संख्या :
वर्ष प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला
२०१७ १०
२०१८ २४
२०१९ १५
२०२० १०
२०२१ ७
एकूण ६६

कौटुंबिक वादामुळे त्रस्त झालेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी व त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्वयंसिद्धा हा उपक्रम पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. आतापर्यंत ६६ महिलांनी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे.
- सुभाष काफरे, मुख्य न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top