
नवरा शेवटी नावाला बायकोच खरी कामाला!
ऑॅफिसमधून दमून- भागून परेश आल्यानंतर त्याने प्रथम मुलांचा अभ्यास घ्यायला सुरवात केली.
‘‘आजपासून मी नियमितपणे वेळच्यावेळी घरी येणार व न चुकता मुलांचा अभ्यास घेणार.’’ परेशने घोषणा केली.
‘‘काय हो ऑफिसमधल्या माधवीची बदली झाली का? की तिनं तुम्हाला ब्लॉक केलं.’’ राधिकानं किचनमधून विचारलं पण परेशनं तिच्याकडं दुर्लक्ष केलं.
‘‘मिनू, कितवीत आहेस गं?’’ परेशच्या या प्रश्नावर मात्र राधिकाला हसू फुटलं.
‘‘अहो, आता ती सातवीत आहे.’’ तिने आतूनच उत्तर दिलं.
‘‘मग चौथीत कोण आहे.?’’ परेशने विचारलं.
‘‘बाबा, मी गेल्यावर्षी चौथीत होतो. आता पाचवीत आहे.’’ बंडूने उत्तर दिलं.
‘‘हो का? लॉकडाउन आणि ऑनलाइन शिक्षणामुळं कोण कितवीला आहे, हेच कळेनासे झालंय? बरं मिनू तू गणिताचं पुस्तक काढ आणि बंडू तू इंग्रजीचं पुस्तक काढ. आज तुमच्या दोघांचा अभ्यास मी घेतो.’’ परेशने म्हटले.
बाबा आपला अभ्यास घेणार, या कल्पनेचीच दोघांनी धास्ती घेतली. मग परेशने बंडूला सातवीतील गणितं घातली व मिनूला पाचवीतील इंग्रजीचे प्रश्न विचारून गोंधळ घातला. बंडूला एवढी साधी गणितं न आल्यानं त्याने त्याच्या पाठीत धपाटा घातला व मिनूने पाचवीची इंग्रजीची उत्तरे पटापट दिल्याने त्याने तिचे कौतुक केले. हा सावळागोंधळ पाहून राधिका हॉलमध्ये आली.
‘‘अहो, आज सूर्य कोठे उगवलाय? तुम्ही चक्क मुलांचा अभ्यास घेताय. तो देखील चुकीचा.’’ राधिकानं असं म्हटल्यावर परेश ओशाळला. मग त्याने बादलीभर पाणी घेऊन, गॅलरीमधील झाडांना ते घालू लागला.
‘‘अहो, त्यांना सकाळीच भरपूर पाणी घातलंय. जादा पाण्यानं ती बिचारी मरून जातील. रात्री कोणी झाडांना पाणी घालतं का?’’ राधिकानं टोमणा मारला.
गॅलरीत पाणी नेताना फरशीवर पाणी सांडलं होतं. ते त्याने पुसून घेतलं. बेडरूममध्ये कपडे अस्ताव्यस्त लटकावली होती. ती त्याने व्यवस्थित लावून घेतली. ओला टॉवेल सोफ्यावर तसाच पडला होता. तो उचलून त्याने वाळत घातला.
‘‘राधिका, तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे. कुटुंबाला वेळ देणं, बायको-मुलांना सुखी ठेवणं हाच खरा पुरुषार्थ असतो. आपल्या संसारासाठी तू रोज किती कष्ट करतेस. पण मी त्याची जाणीव ठेवली नाही तर माझ्यासारखा करंटा मीच. त्यामुळं आज मी स्वयंपाक करतो. तू आराम कर.’’ परेशचं बोलणं ऐकून, दोन्ही मुलं भेदरून गेली.
आई आजारी असताना बाबाने नाश्त्याला केलेले पोहे त्यांना आठवले. सगळा त्याने लगदा केला होता. उपीट समजून त्यांनी ते पोहे खाल्ले होते. भारताच्या नकाशासारखा चपात्यांचा आकार पाहून, मुलांची भूक पळून गेली होती. त्यामुळे आज पुन्हा बाबांनी स्वयंपाक केला तर आपल्याला उपाशी राहावे लागेल, या भीतीपोटी मुले आईला बिलगली.
‘‘नको. मी करते स्वयंपाक.’’ राधिकानं म्हटले.
‘‘ठीक आहे. मग मी भांडी घासतो.’’ परेशने म्हटले. त्यावर मुलांनी निःश्वास सोडला.
‘‘अहो, कामचुकारपणा केल्यामुळे तुम्हाला साहेबांनी झापलंय ना. त्यातच पुरुष सहकाऱ्यांनीही टोमणे मारले. प्रमोशनमध्येही तुम्हाला डावललं गेलंय. घरी येताना वाहतूक कोंडीत अडकल्याने दोघां-तिघांबरोबर भांडणं झाली ना.’’ राधिकानं असं म्हटल्यावर परेश ताडकन उडाला.
‘‘तू काय मनकवडी आहेस काय?’’ त्यानं विचारलं.
‘‘तुम्ही आल्यापासून आज वेगळंच वागत होता. त्यामुळं मी अंदाज बांधला.’’ राधिकानं असं म्हटल्यावर परेशने मान डोलावली. त्याच्या मनावरील मोठं ओझं उतरलं होतं. मग काय रात्री जेवणानंतर ताट तसंच बाजूला सारून, तो व्हॉटसॲपवर बराचवेळ चॅटिंग करत बसला. त्याचवेळी टीव्हीवरील बिग बॉससह इतर मालिका रात्री उशिरापर्यंत एकटाच चवीने पाहत बसला. थोड्यावेळापूर्वीची आश्वासनं हवेतच विरली होती.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..