टॅक्सी बाईक चालकांवर रिक्षा चालकांची दडपशाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॅक्सी बाईक चालकांवर रिक्षा चालकांची दडपशाही
टॅक्सी बाईक चालकांवर रिक्षा चालकांची दडपशाही

टॅक्सी बाईक चालकांवर रिक्षा चालकांची दडपशाही

sakal_logo
By

टॅक्सी बाईक-रिक्षा वाद चिघळला

पुणे, ता. १२ ः कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तसेच नवीन नोकरी मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःची दुचाकी असलेल्या चालकांना टॅक्सी बाईक या सेवेमुळे रोजगार प्राप्त झाला आहे, मात्र या सेवेला रिक्षा चालकांचा विरोध असून रिक्षा चालकांकडून ही सेवा देणाऱ्या दुचाकीधारकांवर दडपशाही सुरू आहे. असा आरोप ही सेवा देणाऱ्या कामगारांनी केला आहे.
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड भागातील काही रिक्षा चालकांकडून अडवणूक करून टॅक्सी बाईक चालकांना त्रास दिला जात आहे. आम्ही आमच्या पोटासाठी हे काम करत आहोत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर अशा प्रकारे अत्याचार होणार असेल तर कसे जगावे, हा मोठा प्रश्न आहे. चार दिवसांपूर्वी एका चालकाने मला रस्त्यात अडवले. मोबाईल हिसकावून घेऊन त्याने फोडला. मात्र मी त्याच्यापुढे हतबल ठरलो. आता मोबाईल नसल्याने मला कामावर जाता येत नाही. त्यामुळे माझा रोजगार बुडाला असून उपासमारीची वेळ आली आहे, कारण मोबाईल शिवाय काम करता येतच नाही, असे सागर दगडे याने कामगाराने सांगितले.

दुचाकी वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याने अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला आहे. रिक्षा चालक विरोध करून, कायदा हातात कसा काय घेता येऊ शकतात.
- राजाराम चव्हाण, टॅक्सी बाईक चालक.

मला एका रिक्षा चालकाने भर रस्त्यात मारहाण केली. पोलिसांनी उलट माझ्यावरच कारवाई करण्यात येईल असे दरडावले. कायदा हातात घ्यायचा अधिकार रिक्षाचालकांना कोणी दिला. दुचाकीने वाहतूक करणे चुकीचे असेल तर त्यांनी कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी. आमच्या सारख्या गरीब कुंटुंबातील कामगारावर अन्याय का करावा.
- आलम पठाण, कामगार

कायदा आहे
बाईक टॅक्सी बंद करण्यासाठी अवैध रित्या दबाव आणला जात आहे. बाईक टॅक्सीसाठी केंद्र सरकारने कायदा केला आहे. ज्या त्या राज्यांनी ही सेवा हवी की नाही हे ठरवायचे आहे. मात्र आपल्या राज्यात याबाबत कोणताच कायदा नाही. कायदा किंवा नियम तयार करण्यात यावा. असा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यामुळे ज्यावर अद्याप कोणताच नियम नाही. त्यावर उगाच रिक्षा चालक का शिक्षा देत आहेत. कारवाई करण्याचा अधिकार सरकारी संस्थांचा आहे.
- जगदीश पाटील, बाईक टॅक्सी, चालक प्रतिनिधी

कायदा नाही
बाईक टॅक्सी ही सेवा बेकायदा आहे. ॲप बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे प्रवाशाला बुकिंग करता येणार नाही. कोणाला कायदा हातात घेता येत नाही. कोणी जर बाईक टॅक्सी चालवत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आरटीओला आहे.
- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

हिंसाचाराचे समर्थन नाही, मात्र बेकायदा मार्गाने व्यवसाय करणे चुकीचे आहे. रिक्षा चालकांच्या रोजगाराचाही प्रश्न आहे. त्यांना देखील बँकेचे हप्ते फेडायचे आहेत. कोणाच्याही पोटावर पाय पडला तर कोणी शांत बसत नसते. बाईक टॅक्सी हा प्रकार मुळात बेकायदा आहे. तसे आरटीओने प्रसिद्ध पत्रक काढले आहे.
- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत संघटना

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top