स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे

स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे

पुणे, ता. ३१ : अनुसूचित जातींमधील वीरशैव कक्कया (ढोर) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी वीरशैव कक्कया कल्याण मंडळ मुंबईमार्फत करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्यभरात बैठका घेण्यात येत असून, या मागणीला वीरशैव कक्कया समाज विकास मंडळाने पाठिंबा दर्शविला आहे.

वीरशैव कक्कया समाज सरकारी महामंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहिला आहे. या समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना सरकारी योजनेचा आर्थिक लाभ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यभरात वीरशैव कक्कया समाजाच्या वतीने बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. वीरशैव कक्कया कल्याण मंडळ आणि वीरशैव कक्कया समाज विकास मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सोनावणे यांच्या वतीने पुण्यात रविवारी बैठक घेण्यात आली. यापूर्वी सोलापूर येथे २७ जानेवारी रोजी, २८ जानेवारीला शिखर शिंगणापूर आणि २९ जानेवारीला बारामती येथे बैठक घेण्यात आली.

राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे, अशी मागणी वीरशैव कक्कया कल्याण मंडळ मुंबईच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समाज बांधवांच्या बैठका घेऊन महामंडळ स्थापन करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महामंडळ निर्मितीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या दौऱ्यात वीरशैव कक्कया कल्याण मंडळ मुंबईचे अध्यक्ष महादेव शिंदे, सचिव यशवंत नारायणकर, प्रमुख प्रवक्ते रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत इंगळे, देहू-आळंदी कक्कया पायी दिंडी मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सहभाग घेतला. वीरशैव कक्कया समाज विकास मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सोनावणे यांनी सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात चार दिवसांच्या दौऱ्यात सहभागी होऊन महामंडळाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.

राज्य सरकारकडे करणार शिफारस...
समाजाच्या शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सोलापूर मतदारसंघातील आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमोल आणि उमरगा लोहारा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट घेतली. त्यांना स्वतंत्र महामंडळ निर्मितीच्या मागणीचे निवेदन देऊन राज्य सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी केली. त्यावर लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे शिफारस करण्याबाबत आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com