दीड वर्षांत सीएनजी ११ रुपयांनी महागले

दीड वर्षांत सीएनजी ११ रुपयांनी महागले

पुणे, ता. १५ : पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांना परवडेल असा पर्याय होता तो सीएनजीचा. मात्र आता सीएनजी देखील भाव खात असून, गेल्या दीड वर्षांत या इंधनाची किंमत प्रतिकिलो ११ रुपयांनी वाढली आहे. एक जुलै २०२० रोजी ५४.८० रुपये असलेले सीएनजी आता ६६ रुपये किलो झाले आहे.
गेल्या वर्षी अनलॉक सुरू झाल्यानंतर इंधनाच्या किमती दररोज वाढत होत्या. पेट्रोल १०० रुपये लिटर झाल्यानंतर इंधन दरवाढ थांबेल, अशी आस वाहनचालकांना होती. मात्र, इंधन दरवाढीने अगदी शंभरी गाठल्यानंतरही किमती वाढतच होत्या. या काळात डिझेल आणि पेट्रोल महाग झाल्याने अनेकांनी सीएनजीचा पर्याय स्वीकारला होता.

पेट्रोल चालकांनी त्यांची वाहनेदेखील सीएनजीमध्ये बदलली होती. मात्र आता त्यांचीदेखील निराशा होत आहे. सीएनजी किट बसविण्यासाठी २० ते ३५ हजार रुपये खर्च करून आता महागलेला सीएनजी भरावा लागत आहे.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून वाहनचालकांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, सीएनजी चालकांना बसत असलेला इंधन दरवाढीचा झटका अद्याप थांबलेला नाही.

सीएनजी तयार करण्यासाठी स्थानिक आणि आयात केलेले असे दोन प्रकारचे गॅस वापरण्यात येतात. आयात करण्यात येत असलेल्या गॅसची किंमत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर स्थानिक गॅसचीदेखील गेल्यावर्षी दरवाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी महागला आहे. स्थानिक गॅसचे दर आता एप्रिलमध्ये निश्चित होणार आहेत. त्यानुसार गॅसच्या किमती कमी राहतील किंवा महागतील याचा निर्णय होईल. मात्र यावर्षी सीएनजीचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
- दीपक सावंत, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड

सीएनजीचे वाढलेले दर
तारीख - वाढलेली किंमत - दर (प्रतिकिलो)
१ जुलै २०२० - १ रुपये - ५४.८०
१० ऑक्टोबर २०२० - ९५ पैसे (दर कमी झाला) - ५३.८५
०४ जानेवारी २०२१ - १.६५ रुपये - ५५.५०
४ जून २०२१ - १.५० रुपये - ५६.६०
२ ऑगस्ट २०२१ - ९० पैसे - ५७.५०
४ ऑक्टोबर २०२१ - २ रुपये - ५९.५०
१३ ऑक्टोबर २०२१ - २.६० रुपये - ६२.१०
१८ नोव्हेंबर २०२१ - १.८० रुपये - ६३.९०
११ जानेवारी २०२२ - ६६.००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com