पीएमपी बसमध्ये स्पर्धा मीस्टर-मिसेस ‘युनिवर्स’ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपी बसमध्ये स्पर्धा
मीस्टर-मिसेस ‘युनिवर्स’ल
पीएमपी बसमध्ये स्पर्धा मीस्टर-मिसेस ‘युनिवर्स’ल

पीएमपी बसमध्ये स्पर्धा मीस्टर-मिसेस ‘युनिवर्स’ल

sakal_logo
By

मा. आगारप्रमुख,
पीएमपीएल,
साहेब, कोरोनाविषयक सगळे नियम पाळून सहा फूट अंतर ठेवून आमचा सप्रेम नमस्कार.

विषय : प्रवाशांचा किमान शब्दात कमाल अपमान करण्याची आणखी एक संधी पीएमपीएलच्या वाहकांना मिळवून दिल्याबद्दल आभार.

साहेब, मी धोंडिराम गोटीराम दगडे बक्कल नं. ३६६३. साहेब, मी एक गरीब वाहक असून, प्रवाशांचा अपमान करण्याच्या कामगिरीवर माझी नेमणूक झाली असून, ते काम मी इमाने-इतबारे करीत आहे. साहेब, हल्ली दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच पीएमपीमधून प्रवास करण्यास परवानगी आहे. आधीच आम्हाला काम कमी होते. त्यातच प्रवाशांचे सर्टिफिकेट वा युनिवर्सल पास तपासण्याचेही काम आमच्यावर आले. आता आम्ही एका हाताने तिकिटे फाडतो, दुसऱ्या हाताने पास तपासतो व तोंडाने प्रत्येक बसथांब्यावर ‘मागची बस रिकामीच आहे’, असं ओरडून सांगत असतो. साहेब, आधी आम्ही प्रवाशांवर सुटे पैसे नाहीत का? उतरा खाली, असे म्हणून खेकसायचो. या एकाच कारणावरून आम्ही कित्येक वर्षे प्रवाशांवर खेकसत काढली. याला आम्हीदेखील कंटाळलो होतो. प्रवाशांचा अपमान करण्यासाठी, त्यांच्यावर खेकसण्यासाठी काहीतरी वेगळं कारण द्या, असा अर्ज आम्ही नुकताच केला होता. मात्र, त्याची एवढ्या तातडीने दखल घेतली जाईल, असे वाटले नव्हते. मात्र, दोन डोस झालेल्यांचे सर्टिफिकेट तपासा, असा आदेश आल्याने आम्ही सुखावलो. आता प्रवासी बसमध्ये शिरल्यावर आम्ही ‘पास बघू’ असे जोरात ओरडतो. मग तो भांबावून प्रवासाचा पास दाखवतो. मग आम्ही त्याला वेड्यात काढतो. ‘युनिवर्सल पास बघू,’ असं आम्ही दरडावून विचारतो. त्यावर तो घाबरून ‘माझ्याकडे नाही’ असे म्हणतो. मग आम्ही त्याचा किमान शब्दात कमाल अपमान करतो व त्याला ‘उतरा खाली’, असे जोरात म्हणतो. प्रवाशाचा असा अपमान केल्यावर आम्हाला मन:शाती मिळते.
साहेब, आपल्यातील काही कर्मचारी आपल्या धोरणाशी विसंगत वागतात. त्यांना समज द्यावी. काहीजण प्रवाशांशी प्रेमाने वागतात, कोणावर खेकसणं तर सोडाच साधं रागावत नाही. सुट्या पैशांवरून अजिबात वाद घालत नाहीत, प्रवाशांना इच्छितस्थळी सोडतात. हे असं कसं चालेल? पीएमपीचा वाहक म्हणून आपण जो नावलौकिक मिळवला आहे, त्याला अनेकजण (आपल्या भाषेत) ऑइल फासतात. अशा काही लोकांची यादी मी तुम्हाला पाठवतो. त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
साहेब, पीएमपी बसमध्ये सर्वाधिक दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रवासी आहे, याचं प्रशिक्षण आम्हाला पहिल्याच दिवशी मिळालं आहे. त्यामुळे या दुर्लक्षित घटकाला शहाणं करुण सोडणं, हाच आमचा खटाटोप असतो. त्यांच्यात संयम या गुणाची वाढ होण्यासाठीच आम्ही त्यांच्यावर खेकसत असतो. ‘पुढे चला...पुढे चला’ असा धोषा आम्ही त्यांच्यामागे लावण्यामागे त्यांनी आयुष्यातही असेच पुढे जावे, असा आमचा हेतू असतो. बसथांब्याच्या बरीच पुढे मुद्दाम गाडी थांबवली जाते. त्यामागे प्रवाशांना पळण्याचा व्यायाम घडावा, हाच हेतू असतो. आताही सर्टिफिकेट नसल्यास आम्ही त्यांचा अपमान करतो, त्यामागेही आयुष्यातील कटू गोष्टी पचवण्याची त्यांना सवय लागावी, हाच आमचा शुद्ध हेतू असतो. आपली पीएमपी ही प्रवाशांसाठी चालती-बोलती शाळा आहे, याची आम्ही प्रवाशांना जाणीव करून देत असतो. त्यामुळे प्रवाशांची युनिवर्सल पास बघण्याची संधी लवकर काढून घेऊ नये, ही विनंती. कालांतराने आधारकार्ड वा पॅनकार्ड बघायचीही संधी आम्हाला मिळावी.

ता. क. : साहेब, आमचा पगार आपण काही वाढवत नाही, किमान तुम्ही तरी आमच्यावर खेकसू नये, ही विनंती.

कळावे,
आपला विश्वासू,
धोंडिराम दगडे

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top