काहीच तक्रार नसेल तर
नागरिकांनो तक्रार करा!

काहीच तक्रार नसेल तर नागरिकांनो तक्रार करा!

तमाम पुणेकरांस या नोटिशीद्वारे सूचित करण्यात येते की, आम्ही आपल्या भागात वाहतुकीची कोंडी होण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले आहेत. या कामी वाहतूक पोलिसांचीही मोठ्या प्रमाणावर मदत घेतली आहे. त्यातच अनेक जागरूक पुणेकरांनी नियम मोडून आम्हाला मोलाची साथ दिली आहे. मात्र, एवढे प्रयत्न करूनही काही ठिकाणी वाहतूक सुरळीत राहत असेल तर प्रशासनास तातडीने कळवण्यात यावे. आम्ही आमची चूक तातडीने दुरुस्त करून, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होईल, याची व्यवस्था करू.
या नोटिसीद्वारे सूचित करण्यात येते, की आम्ही पुण्यातील सर्वच भागातील रस्ते खोदण्यावर भर दिला आहे. मात्र, तरीही नजरचुकीने एखादा रस्ता खोदायचा राहिला असल्यास प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. अशी सूचना प्राप्त झाल्यास काही तासांत पाहणी करून, जागेवरच रस्ता खोदाईच्या कामास मंजुरी दिली जाईल. या कामी टेंडरसारख्या वेळखाऊ प्रक्रियेत वेळ वाया घालवला जाणार नाही, याची हमी आम्ही देत आहेत. बारमाही खोदलेले रस्ते हे पुण्याचे केवळ वैशिष्ट्यच नसून, व्यवच्छेदक लक्षण आहे, याची आम्हाला जाण आहे. खड्डेयुक्त शहर हे आपले धोरण आहे. खड्डा नसलेला रस्ता दाखवा व पाच लाख रुपये बक्षिस मिळवा, अशी आपण स्पर्धा दरवर्षी घेतो. मात्र, एकालाही त्यात बक्षिस मिळाले नाही. हा आपल्या धोरणाचा विजय आहे. मात्र, तरीही कोठे खड्डेविरहित रस्ता असल्यास कळवावे. आपण तातडीने तिथे खड्डे खोदू.
काही भागातून सुरळीत पाणीपुरवठा सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही एवढे प्रयत्न करूनही पाणीपुरवठा सुरळीत कसा राहू शकतो, हा आमच्यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये काही कामसू कर्मचाऱ्यांचा हात असावा, अशी शंका आम्हाला आहे. महापालिकेतील काही कर्मचारी नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करीत असल्याच्या तक्रारी आहेत. लवकरच आम्ही चौकशी समिती नेमून, अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहोत. तरीही तुमच्या पाहण्यात सुरळीत पाणीपुरवठ्याचा परिसर आल्यास आम्हाला कळवावे. आम्ही योग्य ती कारवाई करू.
‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ अशी घोषवाक्य लिहून आपल्या शहराची बदनामी अनेक घटकांकडून सुरु आहे. वास्तविक या घोषवाक्याला हरताळ फासण्याचे काम आमच्याकडून इमानेइतबारे सुरु आहे. ठिकठिकाणी ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या हे त्याचेच प्रतीक आहे. मात्र, अनेक ठिकाणी घंटागाड्याद्वारे कचरा उचलण्याचे काम नित्यनियमाने केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वास्तविक ‘दिसेल तिकडे कचरा’ हे आपले नवे घोषवाक्य आहे. मात्र, काहीजण स्वच्छतेच्या प्रेमात पडले आहेत. तुमच्या भागातही कोणी स्वच्छतेचे अवडंबर माजवत असल्यास आम्हाला तातडीने कळवावे. पुण्यातील सर्वच भागात फ्लेक्सचे पीक उदंड येत आहे. या पिकाला खतपाणी घालण्याचेच आपले धोरण आहे. एकाही बेकायदा फ्लेक्सवर आपण कारवाई केली नाही, हे याचेच प्रतीक आहे. शहराच्या विद्रुपीकरणाला प्रोत्साहन देणे, हीच यामागील भूमिका आहे. मात्र, तरीही काही भागात फ्लेक्सचे प्रमाण कमी असल्यास प्रशासनाला तातडीने कळवावे, आम्ही तातडीने त्या परिसरात फ्लेक्सचे उदंड पीक येईल, याची दक्षता घेऊ. पुण्याच्या काही भागात पीएमपीची सेवा उत्तम मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रवासीही आनंदी असल्याचे समजते. मात्र, हे आपल्या धोरणाच्या विरोधात असून, संबंधित आगारप्रमुखांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येईल. आपल्या निदर्शनासही कोणी प्रामाणिक वाहक-चालक आल्यास आम्हाला तातडीने कळवावे, ही विनंती. याबाबत कोणाचे काही म्हणणे असल्यास नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसांत विहित नमुन्यात तक्रार वा सूचना कराव्यात, ही विनंती.
कळावे,
आपल्या तक्रारींच्या कायम प्रतिक्षेत
आपली महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com