
रोटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठीचा झेंडा
रोटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवात मराठीचा झेंडा
पुणे, ता. १ ः ५२ व्या रोटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट (आयएफएफआर)मध्ये पुण्याचा तरुण दिग्दर्शक सोहील वैद्य याच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ (आदिगुंजन) या मराठी लघुपटाची नुकतीच निवड झाली. विशेष म्हणजे या एकमेव मराठी लघुपटाला हा मान मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सृष्टीसौंदर्य आणि त्याच्याशी असलेले तेथील आदिवासींचे ऋणानुबंध, या लघुपटात उलगडले आहेत. आदिवासींमध्ये असणाऱ्या मिथकीय कथांचा शोध घेता घेता आदिवासी आणि जंगल यांच्यातील सहजीवन आणि हितगूज या लघुपटाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केल्याचे सोहील याने सांगितले. यापूर्वी गोवा येथे झालेल्या ५२ व्या ‘इफ्फी’मध्ये इंडियन पॅनोरमाच्या नॉन-फिचर विभागातही ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या लघुपटाची निवड झाली होती.
या लघुपटाचे संकलन, दिग्दर्शन, कलरिस्ट आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सोहीलनेच पार पाडल्या आहेत. त्याने युएससी फिल्म्स स्कूलमध्ये चित्रपट दिग्दर्शनाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच्या विविध लघुपटांना आजवर जगभरातील सुमारे ८० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये स्थान मिळाले आहे.
- - - - - -
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..